घरक्रीडाबंड्या मारुती, शिवशक्ती उपांत्य फेरीत दाखल

बंड्या मारुती, शिवशक्ती उपांत्य फेरीत दाखल

Subscribe

 स्व.अनिल कर्पे स्मृती पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा- २०१९.

महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आमदार गणपतशेठ गायकवाड व नवतरुण क्रीडा मंडळाने स्व. अनिल महादेव कर्पे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या देवेंद्र फडणवीस चषक पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन-पुणे, शिवशंकर क्रीडा मंडळ-ठाणे, छावा स्पोर्ट्स क्लब-कोल्हापूर, बंड्या मारुती सेवा मंडळ-मुंबई शहर यांनी पुरुषांत, तर महेशदादा लांडगे स्पोर्ट्स क्लब, राजमाता जिजाऊ या पुण्याच्या दोन संघाबरोबर महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब-मुंबई उपनगर व शिवशक्ती महिला संघ- मुंबई शहर यांनी महिलांत उपांत्य फेरीत धडक दिली. या सामन्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली.

कोळशेवाडी-कल्याण(पूर्व) येथील स्व.दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर सुरू असलेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाला ५०-२८ असे सहज नमवित आपली आगेकूच सुरू ठेवली. मुंबई शहराच्या बंड्या मारुती सेवा मंडळाने ५-५ चढायांच्या चुरशीच्या डावात ठाण्याच्या ओम कबड्डी संघाचा प्रतिकार २४-२१(७-४) असा मोडून काढत उपांत्य फेरीत धडक दिली. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या खेळल्या गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला ९-८ अशी आघाडी बंड्या मारुतीकडे होती. शेवटची चढाई शुभम चौघुलेने केली. त्याची पकड झाली असती तर पुन्हा सुवर्ण चढाईचा डाव खेळावा लागला असता. पण त्याने दोन गडी टिपत संघाला ३ गुणांनी विजय मिळवून दिला. कोल्हापूरच्या छावा स्पोर्ट्स क्लबने स्व. आकाश क्रीडा मंडळाचे आव्हान ३५-१७ असे संपविले. तर ठाण्याच्या शिवशंकर क्रीडा मंडळाने उपनगरच्या सत्यम सेवा मंडळाला ३६-२३ असे नमवित उपांत्य फेरी गाठली.

- Advertisement -

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याच्या महेशदादा लांडगे स्पोर्ट्सने चुरशीच्या लढतीत ठाण्याच्या शिवतेज मंडळाला २५-२० असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. पुण्याच्याच राजमाता जिजाऊ संघाने उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टसवर ३९-२४ अशी मात केली. तर उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सने एकतर्फी सामन्यात ठाण्याच्या राफा नाईक संघाचा ४९-०८ असा धुव्वा उडविला. मुंबई शहराच्या शिवशक्ती महिला संघाने शहरच्याच डॉ.शिरोडकर स्पोर्ट्सवर ४३-१९असा लिलया विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली. या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वराज्य स्पोर्टसने अमरहिंदला २७-२०; तर डॉ. शिरोडकरने महात्मा फुलेला ३८-३७ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

अशा असतील उपांत्य लढती

बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन विरुद्ध बंड्या मारुती सेवा मंडळ आणि शिवशंकर क्रीडा मंडळ विरुद्ध छावा स्पोर्ट्स क्लब अशा पुरुषांत, तर राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स विरुद्ध महेशदादा लांडगे स्पोर्ट्स आणि शिवशक्ती संघ विरुद्ध महात्मा गांधी स्पोर्ट्स अशा महिलांत उपांत्य लढती होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -