घरक्रीडामायदेशी परतल्यावर सिराज एअरपोर्टहून थेट गेला वडिलांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी

मायदेशी परतल्यावर सिराज एअरपोर्टहून थेट गेला वडिलांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी

Subscribe

सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचे २० डिसेंबरला निधन झाले.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर सलग दुसऱ्यांदा पराभूत केले आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारताचे खेळाडू गुरुवारी सकाळी मायदेशी परतले. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारतात परतल्यावर घरी न जाता, एअरपोर्टहून थेट दफनभूमीत गेला. तिथे जाऊन त्याने वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले. सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचे २० डिसेंबरला निधन झाले. मात्र, त्याआधी काही दिवस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. सिडनी येथे सराव करत असताना सिराजला वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी समजली होती. मात्र, क्वारंटाईनच्या नियमांमुळे सिराजने मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला होता.

‘माझ्या मुलाने देशाचे नाव मोठे करावे,’ असे सिराजच्या वडिलांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द सिराजच्या खेळात दिसून आली. त्याने ऑस्ट्रेलियन दौऱ्यात उत्कृष्ट खेळ केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजांना दुखापत झाल्याने सिराजवर मोठी जबाबदारी होती. त्याने ही जबाबदारी अप्रतिमरीत्या पार पाडली.

- Advertisement -

सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांत १३ विकेट घेतल्या. भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर होता. प्रत्येक विकेटनंतर तो आकाशाकडे पाहून दोन्ही हात वर करायचा. तो त्याच्या कामगिरीतून वडिलांना आदरांजली वाहत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -