घरक्रीडामुंबईची विजयी सलामी

मुंबईची विजयी सलामी

Subscribe

रणजी करंडकात बडोद्यावर ३०९ धावांनी मात

स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ मुंबईने रणजी करंडकाच्या नव्या मोसमाची विजयी सुरुवात केली. त्यांनी एलिट गट बच्या सामन्यात बडोद्याचा ३०९ धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने हा सामना जिंकण्यासाठी बडोद्यासमोर चौथ्या डावात ५३३ धावांचे कठीण आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना बडोद्याचा डाव २२४ धावांवर आटोपला. पहिल्या डावात ६ विकेट्स मिळवणार्‍या शम्स मुलानीने दुसर्‍या डावातही आपली चमक दाखवत बडोद्याच्या ४ फलंदाजांना माघारी पाठवले. या विजयामुळे ४१ वेळच्या रणजी विजेत्या मुंबईने ६ गुणांची कमाई केली.

चौथ्या डावात ५३३ धावांचा पाठलाग करताना तिसर्‍या दिवसअखेर बडोद्याची ३ बाद ७४ अशी अवस्था होती. चौथ्या दिवशी यापुढे खेळताना अभिमन्यूसिंह राजपूत (५३) आणि दीपक हुडा (६१) यांनी संयमाने फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या. मात्र, इतर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे बडोद्याचा डाव २२४ धावांवर संपुष्टात आला. मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने दोन्ही डावांत मिळून १० गडी बाद केले. दुसर्‍या डावात त्याला शशांक अत्तारडे आणि आकाश पारकर यांनी २-२ विकेट्स घेत चांगली साथ दिली.

- Advertisement -

त्याआधी मुंबईने आपल्या पहिल्या डावात ४३१ धावा केल्या, तर दुसरा डाव ४ बाद ४०९ वर घोषित केला होता. मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने दुसर्‍या डावात १७९ चेंडूत १९ चौकार आणि ७ षटकारांसह २०२ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवची (७० चेंडूत नाबाद १०२ धावा) उत्तम लाभली. त्यांच्या या आक्रमक खेळामुळेच मुंबईच्या गोलंदाजांना दुसर्‍या डावात बडोद्यच्या दहा विकेट्स मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.

संक्षिप्त धावफलक – मुंबई : ४३१ आणि ४ बाद ४०९ डाव घोषित विजयी वि. बडोदा : ३०७ आणि २२४ (दीपक हुडा ६१, अभिमन्यूसिंह राजपूत ५३; शम्स मुलानी ४/७२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -