हार्दिकची जागा घेण्याचा विचार नाही – शिवम दुबे

शिवम दुबे

स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून दमदार केल्यामुळे मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेची भारताच्या टी-२० संघात निवड झाली. त्याने मागील महिन्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठीही त्याने आपले संघातील स्थान कायम राखले. प्रमुख अष्टपैलू हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे सध्या मैदानाबाहेर रहावे लागत असल्याने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही दुबेची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, मी हार्दिकची जागा घेण्याबद्दल विचार करत नाही, असे दुबेने स्पष्ट केले.

हार्दिकची जागा घेण्याबद्दल मी विचार जराही विचार करत नाही. मात्र, मला संधी मिळाली आहे आणि मी त्याचा योग्य उपयोग करत संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. संघातील प्रत्येक जण मला पाठिंबा देत आहे. खासकरून कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाच्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये असताना मला खूप आनंद मिळतो, असे दुबे म्हणाला.

अष्टपैलू असल्यामुळे दुबेसाठी फिटनेस खूप महत्त्वाची आहे. त्याने मागील काही वर्षांत फिटनेस आणि आपल्या गोलंदाजीवर विशेष मेहनत घेतली आहे. याबाबत त्याने सांगितले, अष्टपैलू असल्याने मला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत योगदान द्यावे लागते. मला फिटनेसवर खूप मेहनत घ्यावी लागते. फिटनेस टिकवणे खूप आव्हानात्मक असते. मला माझ्या गोलंदाजीबाबत शाश्वती आहे. टी-२० क्रिकेटमध्ये, मी प्रत्येक सामन्यात चार षटके टाकू शकतो असे मला वाटते.

टीम इंडिया जगात सर्वोत्तम!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार असून यातील पहिला सामना ६ डिसेंबरला होईल. विंडीजचा संघ या मालिकेत भारताला चांगली झुंज देईल, असे शिवम दुबेला वाटते. विंडीजचा संघ टी-२० क्रिकेटमध्ये नेहमीच चांगला खेळतो. ते या मालिकेत आम्हाला झुंज देतील. मात्र, आम्ही या मालिकेसाठी खूप तयारी केली आहे. भारतीय संघ सध्या जगात सर्वोत्तम आहे आणि आम्ही ही मालिका जिंकू याची मला खात्री आहे, असे दुबे म्हणाला.