घरक्रीडाआता प्राधान्य हवं संघबांधणीला !

आता प्राधान्य हवं संघबांधणीला !

Subscribe

लॉर्ड्सवर २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पराभवाची (जेतेपद) हॅट्ट्रिक टाळायची असेल तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कठोर पावलं उचलावी लागतील. भारतीय क्रिकेटमध्ये पूर्वापार संघापेक्षा वैयक्तिक पराक्रम, विक्रम यांना अवास्तव महत्व देण्यात येते. त्यामुळे संघबांधणीकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. व्यक्तीपूजेचं स्तोम माजवलं जातं. परिणामी संघहिताला तिलांजली दिली जाते, असं खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं. त्यामुळे आता संघबांधणीला प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे.

– शरद कद्रेकर

लागोपाठ दुसर्‍यांदा भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला, तर अलीकडेच ओव्हलवर ऑस्ट्रेलियाने भारतावर २०९ धावांनी सफाईदार विजय मिळविला.ऑस्ट्रेलियाचे जागतिक स्पर्धेतील हे नववे जेतेपद (५ वेळा वर्ल्ड कप विजेते, दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते एकदा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन्स आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स) ऑस्ट्रेलिया घवघवीत यश संपादत असताना भारतीय क्रिकेटची जागतिक स्पर्धेतील जेतेपदाची पाटी गेल्या दशकभरात मात्र कोरीच राहिली आहे. जेतेपदाचा हा दुष्काळ यंदा लंडनच्या ओव्हलवर संपेल असं वाटत होतं, पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

- Advertisement -

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये सुरुवातीपासूनच सारं चुकत गेलं. संघनिवड करताना ऑफस्पिनर अश्विनला वगळण्यात आलं आणि इंग्लिश लहरी वातावरणानुसार तेज चौकडी मैदानात उतरविण्यात आली. नाणेफेक जिंकल्यावर ढगाळ वातावरणात स्टार्क, कमिन्स, बोलँड, ग्रीन या ऑस्ट्रेलियन तेज चौकडीला सामोरे जाण्यापेक्षा ऑस्ट्रेलियालाच प्रथम रिंगणात खेचण्याचे डावपेच लढवले गेले, पण पहिल्या सत्रातील ब्रेकथ्रुनंतर मात्र सामान्याची सारी सूत्र अखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या हातात गेली. हेड-स्मिथ यांच्या प्रदीर्घ द्विशतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत नेले आणि त्याक्षणी भारताच्या हातून सामना निसटला. भारतीय फलंदाजी कागदावर बलवान भासते, पण दीड वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करणार्‍या अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता इतर तथाकथित नामवंतांनी हाराकिरी केली आणि संघाला अडचणीत आणले.

आयपीएलच्या हँगओव्हरमधून भारतीय खेळाडू बाहेर पडलेच नाहीत. परिणामी लागोपाठ दुसर्‍यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. टी-२० च्या व्हाईट बॉल क्रिकेटच्या मानसिकतेतून भारतीय खेळाडू बाहेर पडलेच नाहीत. बीसीसीआयच्या लेखी आयपीएल ही प्रतिष्ठेची मानाची स्पर्धा. ऑस्ट्रेलियाचे फारसे खेळाडू यंदा आयपीएलमध्ये नव्हते. कारणे काहीही असोत. यंदा पावसाच्या व्यत्ययामुळे आयपीएलची फायनल १ जून रोजी रात्री उशिरापर्यंत आटोपली आणि ७ ते ११ जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना खेळला गेला. त्यात भारतीय खेळाडूंचीच परवड झाली. लाल चेंडूचे सामने चेतेश्वर पुजारा पुरेसे खेळला आहे. इंग्लिश काऊंटी क्रिकेट स्पर्धेत पुजाराने धावादेखील केल्या, पण ओव्हलवर तो अपयशी ठरला. दुसर्‍या डावात तर पुजारा १०२ कसोटी सामने खेळलाय, पण त्याने आपली विकेट फेकली ते बघितल्यावर खेद वाटला. कोहलीदेखील बेजबाबदार फटका मारून झेलबाद झाला.

- Advertisement -

कर्णधार रोहित शर्मा पण दोन्ही डावात अपयशी ठरला. त्याचे डावपेच फसले. संपूर्ण संघ छाप पाडण्यात अपयशी ठरला.
आयपीएलचा व्याप दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि पुढंदेखील तो निश्चितच वाढत जाणार आहे याचा परिणाम भारतीय संघाला भोगावा लागतोय, परंतु बीसीसीआयला त्याची काही फिकीर नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडमध्येच होते. एव्हाना दोन झाल्या आहेत. अन् २०२५ मध्ये लॉर्ड्सवर फायनल खेळली जाईल. आयपीएल मे अखेरपर्यंत खेळली जाते, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जूनच्या पहिल्या / दुसर्‍या आठवड्यात खेळवली जाते. त्यामुळे खेळाडूंना व्हाईट बॉल क्रिकेटकडून रेड बॉल क्रिकेटकडे वळावे लागते. सराव सामने पण हल्ली व्यस्त कार्यक्रमामुळे आयोजित केले जात नाहीत. भारतीय संघाच्या हितार्थ बीसीसीआयने आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करणे अपेक्षित आहे.

आणखी एका महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष द्यायला हवं सर्वांनीच अन् खास करून बीसीसीआयने. कसोटी सामने निकाली होताहेत ही स्वागतार्ह बाब, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुण मिळविण्याच्या नादात खेळपट्टीचं स्वरूप विलक्षण झपाट्याने बदललं आहे. खासकरून भारतात! पाटा खेळपट्टी नको, पण ‘आखाडा’ खेळपट्टी बनवून दोन/तीन दिवसातच सामन्याचा निकाल लावणंदेखील धोकादायकच! कसोटी सामने पाहण्यासाठी इंग्लंडचा अपवाद वगळता फारसे प्रेक्षक येत नाहीत, पण ‘निकाली सामने’ तेदेखील तीन दिवसाचे (बहुतांशी) होऊ लागले, तर प्रेक्षक कसे येतील स्टेडियममध्ये, याचाही क्रिकेटधुरीनांनी विचार करायला हवा!

सामने निकाली व्हायला हवेत याबाबत दुमत नाही, पण फिरकीला अनुकुल भिंगरी खेळपट्टीवर फलंदाज खेळी रचणार कसा? प्रेक्षकांना चौकार-षटकारांची आतषबाजीदेखील बघायची असते. त्यासाठी पदरमोड करून महागडी तिकिटे काढून ते स्टेडियममध्ये येतात, पण कोसळणारे डाव बघायला प्रेक्षक कशाला येतील? परंतु आज जमाना आहे स्पॉन्सर्सचा. स्टेडियममधील मोठमोठी होर्डिंग्ज हेच दर्शवतात. शिवाय सामन्याचा प्रक्षेपण हक्क विकून कोट्यवधी रुपयांची कमाई करणार्‍या बीसीसीआयची गंगाजळी फुल्ल असल्यामुळे प्रेक्षक स्टेडियममध्ये येवोत अथवा न येवोत त्यांना फारसा फरक पडत नाही. क्रिकेटचं यशस्वी मार्केटिंग करण्यात बीसीसीआय अग्रेसर आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी विंडीज दौर्‍याने सुरुवात होईल. १२ जुलैपासून २ कसोटी सामने (डॉमनिका आणि त्रिनिदाद) भारतीय संघ खेळेल. नंतर वर्षअखेरीस दक्षिण आफ्रिका दौरा २ कसोटी सामने असा कार्यक्रम २०२३ साठी आखण्यात आला आहे.

आगामी संघ बांधणीसाठी राष्ट्रीय निवड समितीने (अध्यक्ष विरहित) तरुण रक्ताला वाव द्यायला हवा. एकदम घाऊक बदल करण्याऐवजी टप्प्प्याटप्पात बदल करणे हितावह ठरेल. कर्णधारपदासाठी आता नवा नेता निवडण्याची वेळ आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवि अश्विन, रवींद्र जडेजा या सिनियर खेळाडूंनी बरीच वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे, पण आता बुजुर्ग खेळाडूंना परदेशात आता धावा काढणं (सातत्य) कठीण होत आहे. शिवाय अश्विन-जडेजा ही फिरकी जोडगोळीदेखील आता वयस्कर होत असून नवोदितांना संधी देण्यात आता कुचराई करून चालणार नाही. प्रशिक्षक-मार्गदर्शक राहुल द्रविड यांना वर्षभरात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवता आलेला नाही. त्यांच्याकडून अधिक भरीव कामगिरीची अपेक्षा होती. आता आगामी मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सफाईदार यश मिळवून जागतिक स्पर्धेतील भारताचा जेतेपदांचा दुष्काळ संपुष्टात आणेल यासाठी शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -