घरफिचर्ससारांशविवाहसंस्थेवर ‘लिव्ह इन’चा डाग!

विवाहसंस्थेवर ‘लिव्ह इन’चा डाग!

Subscribe

मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या ५६ वर्षीय मनोज साने नावाच्या नराधम प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे कटरने लहान लहान तुकडे केले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने ते कुत्र्याला खायला घातल्याचे क्रूर हत्याकांड उघडकीस आले. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. याअगोदर काही महिन्यांपूर्वी दिल्लीत अशाच प्रकारचे श्रद्धा वालकर हिचे हत्याकांड तिचा प्रियकर आफताब या आरोपीने घडवून आणले होते. प्रेम या शब्दावर विश्वास ठेवून प्रेमभंग होताना राक्षसी वृत्तीने मृतदेहाची क्रूर पद्धतीने विटंबना या प्रकरणात केलेली आहे. त्यामुळे समाजात एकच खळबळ उडाली आहे. खरंच अशा कृतीमुळे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा विवाहसंस्थेवरील डाग ठरत आहे का? हा विचार समाजाला पडू लागला आहे. त्याचा हा कायदेशीर लेखाजोखा.

– अ‍ॅड. गोरक्ष कापकर

पाश्चात्य देशांच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृतीतील चालीरीती व परंपरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला असून लग्न हे अनेकांना बेडीप्रमाणे वाटू लागल्याने त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना भारतातील मोठ्या महानगरामध्ये अस्तित्वात आली आहे. खरंतर असे संबंध कायद्याने गुन्हा, अगर पाप नाही. असे असले तरी आपल्या देशाने नैतिकतेच्या कारणावर त्याला मान्यता दिलेली नाही. काही दिवसांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला व्यक्तिगत जीवन जगण्याच्या अधिकाराचा तसेच विचार स्वातंत्र्याचा दाखला देऊन या संबंधांना कायदेशीर मान्यता द्यावी यासाठी अनेक संघटना सरकार तसेच कोर्टाकडे त्याबाबत मागणी करताना दिसत आहेत.

- Advertisement -

सुरुवातीचे लव्ह रिलेशनशिपचे नंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रूपांतर होते. ह्या संकल्पनेला हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन तसेच जगातील अनेक धर्माच्या प्रक्रियेत नैतिकतेच्या दृष्टीने स्थान नाही. प्रेम किंवा लफड्यात गुंतलेले अनेक जण समाजाने त्यांच्या कृतीवर बोट ठेवू नये म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो, असे सांगतात. लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेला सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालात विशद केले. भारतात लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल कायद्यात स्पष्टता नाही. हा प्रश्न विवाहसंस्थेला आव्हान करणारा असल्याने त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आले आहे. विशेषत: महानगरामध्ये कामानिमित्त घरापासून बाहेर असणार्‍या तरुण-तरुणींमध्ये या गोष्टी सर्रासपणे चालतात असे अनेक प्रकरणात दिसते.

अशा जोडप्यांमध्ये लव्ह (प्रेम) आहे तोपर्यंत सारं काही आलबेल असतं, जसं जसं जोडप्यामध्ये शारीरिक आकर्षण कमी होतं, तसतसे या जोडप्यांमध्ये तणाव निर्माण व्हायला सुरुवात होते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र आलेले जोडपे साधारणत: शारीरिक आकर्षण या मुद्यावर जास्त प्रमाणात एकत्र येतात. या संबंधांना कोणत्याही प्रकारे नातेवाईकांची किंवा समाजाची मान्यता नसते. बर्‍याच वेळा अशी जोडपी ही लपून संबंधांमध्ये उतरलेले असतात.

- Advertisement -

त्यांच्या नातेवाईकांना या गोष्टी माहिती झाल्यानंतर अनेक वेळा जोडप्यांमध्ये वाद निर्माण होतात. तसेच अनेकदा जोडप्यांमध्ये जोपर्यंत शारीरिक आकर्षण आहे, तोपर्यंत ते एकत्रित राहतात. एकदा शारीरिक आकर्षण संपले की त्यांची मनं तुटायला वेळ लागत नाही. वाद टोकाला जातात, एकमेकांवर संशय घेतला जातो. या संबंधांना कोणतेही नैतिक अधिष्ठान व समाजमान्यता नसल्याने झालेले वाद मध्यस्थांमार्फत मिटवले जात नाहीत. त्यामुळे वाढत जातात. त्याचीच परिणती अशा हत्याकांडामध्ये झालेली दिसून येते.

हल्ली भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचे मोठे फॅड वाढत चाललेले आहे. या संबंधांना सामाजिक मान्यता मिळत नसल्याने ते फक्त मजा करण्यापुरते उरत आहे. त्यामुळे वैवाहिक संस्थेला त्याने मोठी आव्हाने निर्माण केली आहे. या संबंधातील जोडप्यांना कायद्यामध्ये स्पष्टता नसल्याने कोर्टामध्ये न्याय मिळतो असे नाही. तरी काही कौटुंबिक हिंसाचार कायद्याखालील केसमध्ये कोर्टाने अनेक वर्षांपासून पती-पत्नीसारखे राहत असणार्‍या जोडप्यातील स्त्रीला पोटगी देण्याचा निकाल दिलेला आहे. तसे बघितले तर सर्वसाधारणपणे या संबंधांना सामाजिक व कायदेशीर मान्यता नसल्याने सुरक्षितता हा प्रश्न निर्माण होतो. लिव्ह इन रिलेशनशिपमधील पार्टनर केव्हा बाजूला होतील याची कोणालाही खात्री नाही.

वाढत्या महानगरातील लोकसंख्येमुळे प्रकरणे वाढत असली तरी या संबंधामध्ये पडताना तरुण-तरुणींनी विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. लिव्ह इन पार्टनरची मागची बाजू, त्याचा पूर्व इतिहास, कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण या सर्व गोष्टींचा विचार करूनच अशा संबंधांमध्ये प्रवेश करणे गरजेचे आहे, अन्यथा नंतर पश्चातापाशिवाय काही उरत नाही. अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये विवाहित पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यामुळे व त्यातून वाद निर्माण झाल्यास पीडित महिलेला वार्‍यावर सोडून दिले जाते.

पत्नीचा दर्जा नाकारला जातो तसेच तिच्या व त्याच्या नातेवाईकांची मान्यता नसल्याने अशा प्रकारचे संबंध पुढे जोडल्यापेक्षा तोडले जातात. त्यामुळे मुलींनी भविष्यातील सुरक्षिततेसाठी अशा संबंधापासून दूर राहणे चांगले. अशा प्रकारच्या संबंधांमध्ये गुंतल्यास त्यापासून लिव्ह इन पार्टनरपासून भविष्यातील सुरक्षिततेसाठी तशा प्रकारची तजवीज संबंधित करतो का? की फक्त शरीर सुखासाठी तो आपल्याशी नाते जोडतो आहे हे बघणे गरजेचे आहे. नाहीतर पुढे अशा संबंधातून होणार्‍या अपत्यांबाबत निर्माण होणारे वारसा हक्क, कस्टडीबद्दल तसेच पोटगीसंदर्भात वाद निर्माण होतात.

भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल २१ प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या मर्जीप्रमाणे तसेच हक्काप्रमाणे जीवन जगण्याचा तसेच वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्याचाच भाग म्हणून अशा प्रकारची प्रकरणे वाढत आहेत. कायद्यातील तरतुदीप्रमाणे सज्ञान स्त्री-पुरुष व्यक्तीला एकमेकांसोबत राहण्यासाठी लग्न करण्याची अट बंधनकारक नसल्याचा फायदा ही जोडपी उठवत आहेत.

लिव्ह इन रिलेशनशिपच्या संबंधातून घडणार्‍या घटना, घडलेली हत्याकांडं, त्यातून निर्माण झालेले महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न, तसेच नीतीमूल्यांचे होणारे अध:पतन या गोष्टी निश्चितच विचार करायला भाग पाडणार्‍या आहेत. तसेच अशा प्रकारचे संबंध समाजामध्ये अराजकता निर्माण करीत आहेत. त्यामुळे हा प्रश्न विवाह व्यवस्थेवरील डाग असल्याचे वाटते इतकेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -