PAK VS ENG : भारतीय कंपन्या क्रिकेट मॅच दाखवत असतील तर बघू नका; पाकिस्तान सरकारचा अजब निर्णय

Pakistan Cricket Team

पाकिस्तान सरकारने भारतासोबत असलेल्या वादाची शिक्षा त्यांच्या नागरिकांना दिली आहे. भारतीय कंपन्या क्रिकेट मॅच दाखवत असतील तर बघू नका असाच काहीसा निर्णय पाकिस्तानच्या इम्रान सरकारने घेतला आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड मालिका होणार आहे. आगामी क्रिकेट मालिकेच्या थेट प्रसारणाबाबत भारतीय कंपन्यांशी करार करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. पाकिस्तान सरकारच्या बैठकीनंतर माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तान टेलिव्हिजनने (PTV) या प्रसारणाबाबत स्टार किंवा सोनीशी करार करण्याचा सरकारला आग्रह केला होता.

पाकिस्तान टेलिव्हिजनचा इंग्लंड- पाकिस्तान क्रिकेट मालिका प्रसारणासाठी स्टार आणि सोनी टीव्हीशी करार करण्याचा प्रस्ताव पाकिस्तान सरकारने फेटाळला आहे. भारत सरकार जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार नाही, तोपर्यंत भारतासोबतचे आमचे संबंध सामान्य होणार नाहीत, हे इम्रान सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे, असं फवाद यांनी सांगितलं. दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसणार आहे. स्टार आणि सोनी यांच्याकडे दक्षिण आशियातील सर्व क्रिकेट प्रसारणाचे सर्व अधिकार आहेत. भारतीय कंपन्यांशी करार न करण्याची पाकिस्तान सरकारची भूमिका असल्याने या मालिकेचे पाकिस्तानमध्ये प्रसारण होणार नाही. त्यामुळे या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड तसेच अन्य विदेशी प्रसारण कंपन्यांशी चर्चा करुन मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे पीटीव्ही आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, असे फवाद यांनी सांगितलं.

मालिकेचे वेळापत्रक

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ३ वन-डे आणि ३ टी-२० मालिका ८ जुलैपासून सुरू होणा्र आहे.

पहिली वन-डे – ८ जुलै, कार्डिफ
दुसरी वन-डे – १० जुलै, लॉर्ड्स
तिसरी वन-डे – १३ जुलै, बर्मिंगहॅम

टी-२० मालिका १६ जुलै ते २० जुलै दरम्यान खेळली जाणार आहे.