घरक्रीडाघाटकोपरमध्ये नववीच्या वर्गाची परीक्षा उधळली

घाटकोपरमध्ये नववीच्या वर्गाची परीक्षा उधळली

Subscribe

शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना परीक्षा घेण्याचा घाट

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. तरीही घाटकोपरमधील के.व्ही.के सार्वजनिक स्कूलने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत नववी वर्गाची परीक्षा घेण्याचा घाट घातला होता. शाळेचा हा मनमानीपणा शिक्षक संघटनेने गुरुवारी पोलिसांच्या मदतीने उधळून लावत शाळा प्रशासनाला परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले. शाळेकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

के.व्ही.के सार्वजनिक स्कूल ही राज्य मंडळाशी संलग्न असून, त्यांच्या घाटकोपर, कांदिवली व सायन या तीन ठिकाणी शाळा आहेत. इंग्रजी व गुजराती माध्यमाच्या असलेल्या या तिन्ही शाळांमध्ये 2 ते 24 मार्चपर्यंत नववीची परीक्षा घेण्यात येत आहे, अशी माहिती टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट (टीडीएफ) या शिक्षक संघटनेच्या सदस्यांना मिळाली. त्यानुसार टीडीएफचे अध्यक्ष जर्नादन जंगले, सुरेंद्र मिश्रा व सुनील वडतकर यांनी गुरुवारी सकाळी घाटकोपर पोलिसांना घेऊन शाळेत पोहचले. यावेळी सकाळी 7.30 ते 10.30 वाजताच्या दरम्यान इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा इंग्रजीचा तर गुजराती माध्यमाच्या शाळेचा गुजरातीचा पेपर सुरू असल्याचे त्यांना दिसून आले.

- Advertisement -

शिक्षण विभागाच्या नियमानुसार दहावी व बारावी वगळता अन्य वर्गांच्या परीक्षा या एप्रिलमध्ये घेणे बंधनकारक आहे. त्यातच सध्या करोनाचा प्रसार वाढत असताना राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले असतानाही के.व्ही.के सार्वजनिक स्कूलकडून परीक्षा घेण्यात येत असल्याचे दिसताच टीडीएफच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने परीक्षा बंद पाडली. टीडीएफचे सदस्य व पोलिसांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी पेपर संपला असल्याने विद्यार्थ्यांचा गुरुवारचा पेपर पूर्ण झाला. मात्र टीडीएफच्या सदस्यांनी केलेल्या कारवाईमुळे अखेर शाळा प्रशासनाने इंग्रजी माध्यमाचे उर्वरित दोन तर गुजराती माध्यमाचे उर्वरित तीन पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी अनेक शाळा नववीच्या वर्गाची परीक्षा लवकर घेतात. त्यानंतर सुट्टीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे अतिरिक्त वर्ग घेतले जातात. शिक्षण विभागाकडून अन्य वर्गांची परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येऊ नये असे आदेश असतानाही सर्रासपणे अनेक शाळांमध्ये अशाप्रकारे परीक्षा घेण्याचा घाट घातला जातो. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही के.व्ही.के शाळेने परीक्षा घेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला होता. सर्व शाळांना सुट्टी दिली असताना परीक्षा होत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. टीडीएफच्या सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल पालकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

नियमानुसार नववीची परीक्षा लवकर घेेणे चुकीचे आहे. परीक्षा लवकर घेतल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. परिणामी त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. परीक्षा लवकर घेतल्याने शिक्षकांना दहावीबरोबर नववीचे पेपरही तपासावे लागतात. शाळेने शिक्षण विभागाच्या नियमाचे उल्लंघन करणार्‍या संस्थेवर शिक्षणमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी.
– राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीडीएफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -