घरक्रीडारियाल माद्रिदचे 'ला लिगा'वर राज्य!

रियाल माद्रिदचे ‘ला लिगा’वर राज्य!

Subscribe

हे रियाल माद्रिदचे मागील तीन वर्षांतील पहिले, तर एकूण विक्रमी ३४ वे जेतेपद होते.

करीम बेंझेमाने केलेल्या दोन गोलच्या जोरावर रियाल माद्रिदने गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात विलारेयाल संघाचा २-१ असा पराभव करत ‘ला लिगा’ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रियाल माद्रिदचे हे मागील तीन वर्षांतील पहिले, तर एकूण विक्रमी ३४ वे जेतेपद होते. कोरोनामुळे मार्च ते जून या कालावधीत ला लिगा स्पर्धा बंद होती. परंतु, ११ जूनपासून स्पेनमधील फुटबॉल स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर रियाल माद्रिदने उत्कृष्ट खेळ करत १० पैकी १० सामने जिंकले, ज्यात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला केवळ चार गोल करू दिले. तसेच त्यांनी एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला आघाडी घेण्याची संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी एक सामना शिल्लक असतानाच ही स्पर्धा जिंकली.

लक्ष विचलित होऊ दिले नाही

हा माझ्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीतील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे. लॉकडाऊन आणि इतर सर्व गोष्टी घडल्यानंतरही आम्ही आमचे लक्ष विचलित होऊ दिले नाही, ही फारच कौतुकास्पद गोष्ट आहे. ला लिगा स्पर्धा जिंकणे सोपे नाही. ३८ सामन्यांनंतर तुमच्या खात्यात इतर कोणत्याही संघापेक्षा जास्त गुण आहेत, यासारखी दुसरी गोष्ट नसते, असे रियाल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदीन झिदान म्हणाले. झिदानच्या मार्गदर्शनात याआधी रियाल माद्रिदने एकदा ला लिगा, तर सलग तीन वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आहे.

- Advertisement -

बार्सिलोनाचा खेळ खालावला 

कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित होण्याआधी बार्सिलोनाचा संघ अव्वल स्थानावर होता. परंतु, स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यावर एकीकडे रियाल माद्रिद सर्व सामने जिंकत असताना बार्सिलोनाचे सेव्हिया, सेल्टा व्हिगो आणि अॅथलेटिको माद्रिद यांच्याविरुद्धचे सामने बरोबरीत राहिले. तर गुरुवारी झालेल्या ओसासुनाविरुद्धच्या लढतीत त्यांना १-२ असा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्यात आणि रियाल माद्रिदमध्ये ७ गुणांचा फरक झाला. रियाल माद्रिदने मात्र अप्रतिम खेळ करत विलारेयालवर मात केली आणि ला लिगाच्या चषकावर आपले नाव कोरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -