IND vs AUS : पुजारा तिसऱ्या कसोटीतून आऊट? उपकर्णधारपद रोहित शर्माकडे

उपकर्णधारपदासाठी रोहित आणि पुजारा यांच्यात स्पर्धा होती.

cheteshwar pujara
चेतेश्वर पुजारा

अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची शुक्रवारी कारकिर्दीतील पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने विजय मिळवला होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारताचे नेतृत्व केले होते. या सामन्यात उपकर्णधारपदाची जबाबदारी चेतेश्वर पुजाराने सांभाळली होती. परंतु, आता अखेरच्या दोन कसोटीसाठी रोहितचे संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याची उपकर्णधारपदी नेमणूक केली आहे.

विराट मायदेशी परतल्यानंतर अजिंक्यची कर्णधारपदी निवड झाली. त्यामुळे उपकर्णधारपद रिक्त होते. उपकर्णधारपदासाठी रोहित आणि पुजारा यांच्यात स्पर्धा होती. दुसऱ्या कसोटीत रोहित उपलब्ध नसल्याने पुजारा उपकर्णधार होता. परंतु, रोहितचे आता संघात पुनरागमन झाल्याने तो अखेरच्या दोन कसोटीत उपकर्णधारपद भूषवेल, असे बीसीसीआयच्या सिनियर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. रोहित बरीच वर्षे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा उपकर्णधार आहे. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत कसोटी संघात तो महत्वाची भूमिका बजावेल हे निश्चितच होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका, तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र, आता त्याची उपकर्णधारपदी निवड झाल्याने तो सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वाढली आहे. त्याला सलामीवीर मयांक अगरवाल किंवा हनुमा विहारीच्या जागी भारतीय संघात स्थान मिळू शकेल. रोहितने आतापर्यंत ३२ कसोटीत सहा शतकांच्या मदतीने २१४१ धावा केल्या आहेत.