घरIPL 2020IPL 2020 : संजू सॅमसन भारतासाठी खेळत नसल्याचे आश्चर्य - शेन वॉर्न 

IPL 2020 : संजू सॅमसन भारतासाठी खेळत नसल्याचे आश्चर्य – शेन वॉर्न 

Subscribe

सॅमसनने चेन्नईविरुद्ध अवघ्या ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली होती.  

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न आणि आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स यांच्यात विशेष नाते आहे. वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने पहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे तो या संघाच्या आणि संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष ठेवून असतो. त्याला राजस्थानचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने प्रभावित केले आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थानचा पहिला सामना झाला चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध. या सामन्यात सॅमसनने अवघ्या ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली, ज्यात ९ षटकारांचा समावेश होता. त्यामुळे त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याच्या या खेळीचे वॉर्ननेही कौतुक केले. तसेच सॅमसन भारतीय संघाकडून सातत्याने खेळत नसल्याचे आश्चर्यही वॉर्नने व्यक्त केले.

तो एक चॅम्पियन खेळाडू  

संजू सॅमसन हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्या इतका प्रतिभावान खेळाडू मी मागील बऱ्याच काळात पाहिलेला नाही. मी खूप आधीपासूनच त्याच्या फलंदाजीचा चाहता आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारतासाठी खेळत नसल्याचे मला आश्चर्य वाटते. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे. त्याच्यात मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारण्याची क्षमता आहे. तो यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करेल आणि राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल स्पर्धा जिंकेल अशी मला आशा आहे. तसेच पुढील काळात मी सॅमसनला भारतीय संघाकडून खेळताना पाहण्यास उत्सुक असल्याचे वॉर्न म्हणाला.

- Advertisement -

सॅमसनला छाप पाडण्यात अपयश 

२५ वर्षीय सॅमसन आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करत असतो. परंतु, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही. त्याला भारतासाठी आतापर्यंत ४ टी-२० सामन्यांत केवळ ३५ धावाच करता आल्या आहेत. मात्र, आता भारताचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याच्यात, रिषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्यात स्पर्धा आहे. या तिघांच्या स्पर्धेत सध्या राहुल आघाडीवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -