घरक्रीडाआयपीएल लिलावात शिमरॉन हेटमायरवर लक्ष

आयपीएल लिलावात शिमरॉन हेटमायरवर लक्ष

Subscribe

भारतीय खेळाडूंमध्ये मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेवर मोठी बोली लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

बाराव्या आयपीएल मोसमाआधी मंगळवारी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये एकूण ३५० खेळाडूंवर बोली लागणार आहे. ज्यात ११९ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले, २१९ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आणि २ खेळाडू हे कसोटी क्रिकेटचा दर्जा न मिळालेल्या देशांचे आहेत. सध्या आयपीएलच्या आठ संघांमध्ये मिळून ७० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक खेळाडूंना कराराविनाच लिलावातून परतावे लागणार आहे. मात्र, काही खेळाडू असेही आहेत, ज्यांना प्रत्येक फ्रेंचाइझी आपल्याकडे घेण्यास उत्सुक असेल. प्रत्येक लिलावात एक असा खेळाडू असतो ज्याच्यावर इतर खेळाडूंपेक्षा मोठी बोली लागते. यावेळी तो खेळाडू वेस्टइंडीजचा शिमरॉन हेटमायर असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ओशेन थॉमसवरही फ्रेंचाइझींचे लक्ष 

आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिमरॉन हेटमायरने काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत दौऱ्यात दमदार कामगिरी केली होती. तर त्याआधी झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या १२ डावांत त्याने १४८ च्या स्ट्राईक रेटने ४४० धावा केल्या होत्या. त्यातच बऱ्याच संघाना मधल्या फळीत खेळणाऱ्या आक्रमक फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे या लिलावात ५० लाख ही मूलभूत रक्कम असलेल्या हेटमायरवर मोठी बोली लागेल असा अंदाज आहे. त्याचा वेस्टइंडीज संघातील सहकारी ओशेन थॉमसवरही फ्रेंचाइझींचे लक्ष असेल. तसेच परदेश खेळाडूंमध्ये लसिथ मलिंगा, ब्रॅन्डन मॅक्युलम, निकोलस पुरन, सॅम करन, अॅडम झॅम्पा, हेन्रिक क्लासन, कार्लोस ब्रेथवेट यांना चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे.

शिवम दुबेवर मोठ्या बोलीची अपेक्षा  

भारतीय खेळाडूंमध्ये मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेवर मोठी बोली लागू शकते. दुबेने या रणजी मोसमात खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. याचा फायदा त्याला लिलावात होऊ शकतो. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलवरही फ्रेंचाइझींचे लक्ष असेल. तसेच जयदेव उनाडकट, वृद्धिमान साहा, ईशान पोरेल, मोहम्मद शमी, अनमोलप्रीत सिंग, वरूण चक्रवर्ती या भारतीय खेळाडूंना लिलावात चांगली किंमत मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -