घरक्रीडासिद्धीप्रभाला जेतेपद;अवधूत शिंदे सर्वोत्तम खेळाडू

सिद्धीप्रभाला जेतेपद;अवधूत शिंदे सर्वोत्तम खेळाडू

Subscribe

श्री सिद्धेश्वर मंडळ कबड्डी

सिद्धीप्रभा फाउंडेशनने श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित मनसे चषक कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रभादेवीत झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना प्रभादेवीतीलच दोन संघात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत सिद्धीप्रभा फाउंडेशनने विकास मंडळाला ३१-३० असे पराभूत करत ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो विकास मंडळाचा अवधूत शिंदे. त्याला चषक आणि रोख रु. एक हजार देऊन गौरवण्यात आले.

सिद्धीप्रभा आणि विकास यांच्यातील हा अंतिम सामना पाहण्यासाठी कबड्डी रसिकांना प्रचंड गर्दी केली होती. या सामन्यात सलग दोन गुण घेत सिद्धीप्रभाने दमदार सुरुवात केली. त्याला प्रतिउत्तर देत विकासाने सलग ३ गुण मिळवत आघाडी मिळवली. यानंतर सातव्या मिनिटाला लोण देत विकासने ११-०४ अशी आघाडी वाढवली, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. १८ व्या मिनिटाला सिद्धीप्रभाने या लोणची परतफेड करत १७-१६ अशी आघाडी आपल्याकडे घेतली. मध्यांतराला सिद्धीप्रभाकडे १८-१६ अशी आघाडी होती.

- Advertisement -

मध्यांतरानंतर दुसर्‍याच मिनिटाला २ गुण घेत विकासने १८-१८ अशी बरोबरी केली. पुढे ८-१० मिनिटे हा सामना चुरशीचा झाला. शेवटची ५ मिनिटे पुकारली तेव्हा गुणफलक २७-२५ असा सिद्धीप्रभाच्या बाजूने होता. तर शेवटची २ मिनिटे शिल्लक असताना सिद्धीप्रभाकडे ३०-२६ अशी आघाडी होती, पण शेवटच्या मिनिटाला विकासने ही आघाडी २९-३० अशी कमी केली. शेवटची चढाई विकासाच्या अवधूत शिंदेने केली त्यावेळी ३०-३० असे दोन्ही संघ बरोबरीत होते. सिद्धीप्रभाने अवधूतची पकड करत हा सामना जिंकला आणि या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

सिद्धीप्रभाच्या या विजयाचे श्रेय विवेक मोरे, ओमकार पवार यांच्या चढाया आणि मिलिंद पवार, ओमकार ढवळे यांच्या भक्कम पकडीला जाते. विकासाच्या अवधूत शिंदे, अजित पाटील, विराज सिंग यांनी चांगली झुंज दिली. या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे पारितोषिक सिद्धीप्रभाच्या अनुक्रमे विवेक मोरे आणि मिलिंद पवार यांना मिळाले.

- Advertisement -

त्याआधी झालेले उपांत्य फेरीचे सामने देखील अत्यंत चुरशीचे झाले. पहिल्या उपांत्य सामन्यात दुर्गामाताविरुद्ध सिद्धीप्रभाने मध्यांतरातील १०-१८ अशा ८ गुणांच्या पिछाडीवरून पूर्ण डावात ३०-३० अशी बरोबरी केली, नंतर ५-५ चढायांच्या जादा डावात ३७-३५ अशी बाजी मारली. दुसर्‍या उपांत्य सामन्यात विजयविरुद्ध विकासने मध्यांतरातील १०-१७ अशा ७ गुणांच्या पिछाडीवरून पूर्ण डावात ३२-३२ अशी बरोबरी साधली आणि ५-५ चढायांच्या जादा डावात ४१-३६ असा विजय प्राप्त करत अंतिम फेरीत धडक दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -