घरक्रीडाहोतकरू मंडळाची विजयी सलामी

होतकरू मंडळाची विजयी सलामी

Subscribe

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

होतकरू मंडळ, राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स, शिवतेज मंडळ या संघांनी नव तरुण क्रीडा मंडळाने स्व. अनिल महादेव कर्पे स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात विजयी सलामी दिली. पुरुषांत जॉली स्पोर्ट्स क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, स्व.आकाश क्रीडा मंडळ यांनाही आपापले सामने जिंकण्यात यश आले.

कोळशेवाडी येथील स्व. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर सुरू झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या अ गटातील सलामीच्या सामन्यात ठाण्याच्या रा.फ. नाईक स्पोर्ट्सने रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सचा ४१-१८ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला नाईक संघाकडे १५-९ अशी आघाडी होती. उत्तरार्धात त्यांनी अधिकच आक्रमक खेळ करत हा सामना तब्बल २३ गुणांच्या फरकाने जिंकला. त्यांच्या या विजयात दर्शना सणस, उर्मिला नादावडेकर, छाया कोळी या खेळाडू चमकल्या. मात्र, पुढील सामन्यातच नाईक संघाला राजमाता जिजाऊ स्पोर्ट्सने ५४-२६ असे पराभूत केले.

- Advertisement -

महिलांच्या ब गटात ठाण्याच्या शिवतेज मंडळाने औरंगाबादच्या साई सेंटरचा ४९-३१ असा पराभव केला. पहिल्या डावात २५-१५ अशी आघाडी घेणार्‍या शिवतेजकडून माधुरी गवंडी, प्रगती भुरटे या खेळाडू चांगल्या खेळल्या. क गटात ठाण्याच्या होतकरु मंडळाने मुंबई उपनगरच्या महात्मा फुले स्पोर्ट्सला ३१-२१ असे नमवले. श्रुती निले, राजश्री टिळे यांच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. यानंतर महात्मा गांधी स्पोर्ट्सने ठाण्याच्या ज्ञानशक्ती क्रीडा मंडळाचा ६६-२९ असा पराभव केला.

पुरुषांच्या अ गटात मुंबई उपनगरच्या जॉली स्पोर्ट्सने रायगडच्या रण झुंजार क्रीडा मंडळावर ३०-२१ असा विजय मिळवला. केदारनाथ क्रीडा मंडळाने ठाण्याच्या ओम कबड्डी संघाचा २६-२० असा पराभव केला. ठाण्याच्या जय शिव मंडळाने मुंबई शहरच्या गुड मॉर्निग स्पोर्ट्सला ३५-२३ असे नमवत आगेकूच केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -