घरक्रीडाTokyo Paralympics : भाविना पटेलची उपांत्य फेरीत धडक; गतविजेत्या रँकोव्हिचचा दिला पराभवाचा...

Tokyo Paralympics : भाविना पटेलची उपांत्य फेरीत धडक; गतविजेत्या रँकोव्हिचचा दिला पराभवाचा धक्का

Subscribe

पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली.

भारताची पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलला टोकियो पॅरालिम्पिकच्या (Tokyo Paralympics) उपांत्य फेरीत धडक मारण्यात यश आले. पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. त्यामुळे तिचे पदकही पक्के झाले. महिला एकेरी क्लास ४ च्या उपांत्यपूर्व फेरीत भाविनाने गतविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पेरिक-रँकोव्हिचवर ३-० अशी सरळ गेममध्ये मात केली. भाविनाने अप्रतिम खेळ करताना अवघ्या १८ मिनिटांत ही लढत ११-५, ११-६, ११-७ अशी जिंकत उपांत्य फेरी गाठली.

भाविनाने राखले कामगिरीत सातत्य

भाविनाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याची आक्रमक सुरुवात केली. तिने पहिला गेम अवघ्या पाच मिनिटांत ११-५ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये गतविजेती पेरिक-रँकोव्हिच दमदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु, भाविनाने उत्कृष्ट खेळ सुरु ठेवत पेरिक-रँकोव्हिचला पुनरागमनाची संधीच दिली नाही. तिने दुसरा गेम ११-६ असा जिंकत लढतीत २-० अशी आघाडी घेतली. भाविना कामगिरीत सातत्य राखत तिसरा गेम ११-७ अशा फरकाने जिंकत हा सामना जिंकला आणि स्पर्धेत आगेकूच केले. तिचा उपांत्य फेरीतील सामना शनिवारी खेळला जाईल.

- Advertisement -

पॉवरलिफ्टिंगमध्ये साकीना पाचव्या स्थानावर

त्याआधी भाविनाने शुक्रवारी सकाळच्या सत्रात ब्राझीलच्या जॉईस डी ओलिव्हिएराला ३-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. भाविनाने ही लढत १२-१०, १३-११, ११-६ अशी जिंकली होती. दुसरीकडे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भारताच्या साकीना खातूनला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर गोळाफेकमध्ये तेक चंद आठव्या क्रमांकावर राहिला.


हेही वाचा – ‘गांगुलीप्रमाणेच कोहलीही आक्रमक कर्णधार, पण दोघांमध्ये तुलना नको’!

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -