Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा धावांचा पाठलाग करताना सचिनपेक्षा विराट सरस!

धावांचा पाठलाग करताना सचिनपेक्षा विराट सरस!

एबी डिव्हिलियर्सची स्तुती

Related Story

- Advertisement -

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक सामने, सर्वाधिक शतके असे असंख्य विक्रम आहेत. सचिनचा शंभर शतकांचा विक्रम अनेक वर्षे अबाधित राहील असे वाटत होते. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१ वर्षीय विराटच्या नावे ७० शतके आहेत. विराटने सचिनचा हा विक्रम मोडल्यास त्याची गणना सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होईल. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या मते विराट आताच क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. खासकरुन धावांचा पाठलाग करताना विराट हा सचिनपेक्षाही सरस आहे, असे डिव्हिलियर्सला वाटते.

तेंडुलकर हा विराट आणि माझा आदर्श आहे. त्याच्या काळात अनेक महान फलंदाज होते, पण तरीही त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने आपला स्तर कायम ठेवला. त्याने खूप यश मिळवले, त्यामुळे तो युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे. तेंडुलकरसारखा दुसरा खेळाडू नाही आणि विराटही तुम्हाला हेच सांगेल. मात्र, माझ्या मते धावांचा पाठलाग करताना विराट हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तेंडुलकर कोणत्याही खेळपट्टीवर, परिस्थितीत धावा करायचा. मात्र, दबावात धावांचा पाठलाग करताना विराट हा तेंडुलकरपेक्षाही सरस आहे. विराटसाठी कोणतेही लक्ष्य गाठणे अवघड नाही, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

- Advertisement -

विराट हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने खासकरुन एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने २४८ एकदिवसीय सामन्यांत ११८६७ धावा केल्या असून यात ४३ शतकांचा समावेश आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना त्याने १३८ सामन्यांत ६८.३३३ च्या सरासरीने आणि २६ शतकांच्या मदतीने ७०३९ धावा केल्या आहेत. त्यामुळेच डिव्हिलियर्सने त्याची स्तुती केली.

कोहली हा क्रिकेटचा फेडरर!
विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण असे झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू पॉमी एमबांग्वाने एबी डिव्हिलियर्सला विचारले. यावर एबी म्हणाला की, विराट चेंडू फटकावतो तेव्हा ते अत्यंत नैसर्गिक वाटते. तो या बाबतीत रॉजर फेडररसारखा आहे. याउलट स्टीव्ह स्मिथ हा राफेल नदालसारखा आहे. तो मानसिकदृष्ट्या कणखर आहे. स्मिथची फटकेबाजी तितकीशी नैसर्गिक वाटत नाही. मात्र, त्याने धावा करण्याचे आणि विक्रम मोडण्याचे तंत्र शोधून काढले आहे. विराटने सर्व देशांत जाऊन धावा केल्या आहेत. त्यामुळे मला विराटचा खेळ अधिक आवडतो.

- Advertisement -