घरक्रीडाIND vs AUS : रहाणेच्या ऐतिहासिक यशानंतर कर्णधार कोहलीवर दडपण!

IND vs AUS : रहाणेच्या ऐतिहासिक यशानंतर कर्णधार कोहलीवर दडपण!

Subscribe

रहाणेच्या शांत आणि संयमी नेतृत्व शैलीचा भारतीय संघाला फायदा झाला, असे म्हटले जात आहे.

गॅबाच्या मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांत कोणताही संघ पराभूत करू शकला नव्हता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या भारताने गॅबावरील ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडीत काढले आणि तीन विकेट राखून सामना जिंकला. या विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकत बॉर्डर-गावास्कर करंडक सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे राखला. त्यामुळे कर्णधार म्हणून रहाणेचे खूप कौतुक होत आहे. रहाणेच्या शांत आणि संयमी नेतृत्व शैलीचा भारतीय संघाला फायदा झाला, असे म्हटले जात आहे. रहाणेच्या या ऐतिहासिक यशामुळे नियमित कर्णधार विराट कोहलीवरील दबाव मात्र वाढला आहे.

कोहलीच्या नेतृत्वात लाजिरवाणा पराभव

गॅबावरील निर्णायक कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रहाणेची स्तुती केली. त्याने ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकण्यासाठी जे डावपेच आखले, ते फारच उत्कृष्ट होते, असे शास्त्री म्हणाले. अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला कोहलीच्या नेतृत्वात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा संघ केवळ ३६ धावांत गारद झाला. या सामन्यानंतर कोहली वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आणि त्याच्या अनुपस्थितीत रहाणेने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

- Advertisement -

कर्णधार म्हणून रहाणे अपराजित  

रहाणेच्या नेतृत्वात भारताने अप्रतिम खेळ करताना तीन पैकी दोन कसोटी सामने जिंकत मालिकेत बाजी मारली. रहाणे कर्णधार असताना भारताने आतापर्यंत एकूण पाच कसोटी सामना खेळले असून चार कसोटी सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे आता रहाणेच कर्णधार म्हणून कायम राहिला पाहिजे, असे काही माजी क्रिकेटपटूंना वाटत आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीच भारताचे नेतृत्व करेल. परंतु, भारताला या मालिकेत चांगला खेळ करण्यात अपयश आल्यास कोहलीवरील दडपण वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : विजयाबद्दलच्या भावना शब्दांत मांडणे अवघड – अजिंक्य रहाणे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -