घरक्रीडाबुमराहमुळे विंडीजची घसरगुंडी!

बुमराहमुळे विंडीजची घसरगुंडी!

Subscribe

जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताच्या जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम कामगिरीमुळे दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसअखेर वेस्ट इंडिजची पहिल्या डावात ७ बाद ८७ अशी अवस्था होती. भारताने आपल्या डावात ४१६ धावा केल्या. त्यामुळे विंडीजचा संघ ३२९ धावांनी पिछाडीवर होता आणि त्यांच्या केवळ ३ विकेट्स शिल्लक होत्या.

भारताने केलेल्या ४१६ धावांचे उत्तर देताना वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची खराब सुरुवात झाली. विंडीजचे सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि क्रेग ब्रेथवेट यांनी पहिली ६ षटके खेळून काढली. मात्र, यानंतर बुमराहने भेदक गोलंदाजी करत विंडीजच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. या डावाच्या सातव्या षटकात बुमराहने डावखुर्‍या कॅम्पबेलला यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. बुमराहने आपल्या पुढच्याच आणि डावाच्या नवव्या षटकात डॅरेन ब्रावो (४), शमार ब्रूक्स (०) आणि रॉस्टन चेस (०) यांना सलग तीन चेंडूवर बाद करत हॅट्ट्रिकची नोंद केली. तो कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा भारताचा केवळ तिसरा गोलंदाज आहे. बुमराहनेच ब्रेथवेटलाही माघारी पाठवले आणि आपल्या पाच विकेट्स पूर्ण केल्या.

- Advertisement -

त्यामुळे विंडीजची १३ व्या षटकात ५ बाद अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार जेसन होल्डर आणि युवा शिमरॉन हेटमायर यांनी विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बरेचसे चेंडू हेटमायरच्या बॅटच्या कोपर्‍याला लागून गेले. त्याला संयमाने खेळण्यात अपयश येत होते. अखेर ३४ धावांवर असताना हेटमायरला मोहम्मद शमीने त्रिफळा उडवत बाद केले. त्याने आणि होल्डरने सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. होल्डरही बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर पदार्पण करणार्‍या जहमार हॅमिल्टन आणि रहकीम कॉर्नवॉल यांनी सावध फलंदाजी केल्याने भारताला आणखी विकेट मिळवता आल्या नाहीत. दुसर्‍या दिवसअखेर वेस्ट इंडिजची पहिल्या डावात ७ बाद ८७ अशी अवस्था होती.

त्याआधी हनुमा विहारीच्या कसोटी क्रिकेटमधील पहिल्या शतकामुळे भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. विहारीने २२५ चेंडूत १६ चौकारांच्या मदतीने १११ धावा केल्या. त्याला तळाच्या ईशांत शर्माने ५७ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. हे ईशांतचे कसोटीतील पहिले अर्धशतक होते. त्याने आणि विहारीने आठव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. विंडीजकडून होल्डरने ५, तर कॉर्नवॉलने ३ गडी बाद केले.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

भारत : पहिला डाव ४१६ (विहारी १११, कोहली ७६, ईशांत ५७, अगरवाल ५५; होल्डर ५/७७, कॉर्नवॉल ३/१०५) वि. वेस्ट इंडिज : पहिला डाव ७ बाद ८७ (हेटमायर ३४, होल्डर १८; बुमराह ६/१६, शमी १/१९).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -