WI vs AUS : मी अजूनही खेळतोय यात आनंद माना; गेलचे टीकाकारांना प्रत्युत्तर

गेलने टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार केला.

chris gayle completes 14,000 runs in t20
क्रिस गेलच्या टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण

वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज क्रिस गेलला मागील काही काळात चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. गेल हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. परंतु, मोठी खेळी करण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावरही टीका होत होती. अखेर त्याला सूर गवसला आणि त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात ६७ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याच्या या खेळीत ४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. तसेच या खेळीदरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. या कामगिरीनंतर त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. मी अजूनही खेळतोय यात आनंद माना, असे गेल म्हणाला.

 युनिव्हर्स बॉसचा आदर करा

मी आगामी टी-२० वर्ल्डकपबाबत विचार करत आहे. मला आकड्यांनी फरक पडत नाही. लवकरच ४२ वर्षांचा होणारा क्रिस गेल धावा करत नसल्याची तुम्ही फार चिंता करू नका. क्रिस गेल अजूनही खेळतो आहे यात आनंद माना. जितका काळ शक्य आहे, तितका काळ मी खेळत राहीन. तुम्हीसुद्धा माझ्या खेळाचा आनंद घ्या. क्रिस गेलने किती सामन्यांत अर्धशतक केले नाही, याची समालोचकांनी फार चर्चा करू नये. केवळ युनिव्हर्स बॉसचा आदर करा, असे गेल म्हणाला.

अर्धशतक पोलार्डला समर्पित

तसेच विंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी मिळवली आहे. त्याबाबत गेल म्हणाला, आम्ही मालिका जिंकू शकलो याचा आनंद आहे. ऑस्ट्रेलियासारख्या उत्कृष्ट संघाविरुद्ध मालिका जिंकल्याबद्दल मी आमचा कर्णधार निकोलस पूरनचे अभिनंदन करतो. आमचा नियमित कर्णधार किरॉन पोलार्ड या तिन्ही सामन्यांत खेळला नसला तरी त्याची भूमिकाही खूप महत्त्वाची होती. मी या सामन्यातील अर्धशतक माझ्या विंडीज संघातील सहकाऱ्यांना, विशेषतः पोलार्डला समर्पित करतो.