WTC Final : न्यूझीलंड ‘टेस्ट में बेस्ट’! भारतावर मात करत पटकावली पहिलीवहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

दुसऱ्या डावात कर्णधार केन विल्यमसनने ८९ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली.

ross taylor and kane williamson
रॉस टेलर आणि केन विल्यमसनची ९६ धावांची अभेद्य भागीदारी

कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या डावात केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताचा ८ विकेट राखून पराभव करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयासह त्यांनी अजिंक्यपदाची गदा आणि साधारण १२ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आपल्या नावे केले. अंतिम सामना जिंकण्यासाठी भारताने चौथ्या डावात न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान त्यांनी ४५.५ षटकांत ८ विकेट राखून पूर्ण केले. पहिल्या डावात कर्णधार विल्यमसनचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले होते. दुसऱ्या डावात मात्र त्याने ८९ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्याला अनुभवी फलंदाज रॉस टेलरने नाबाद ४७ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ९६ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे न्यूझीलंडने हा सामना चौथ्या डावात सहजपणे जिंकला.

न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी

साऊथहॅम्पटन येथे झालेल्या या अंतिम सामन्यात पावसाने पहिले चार दिवस जोरदार बॅटिंग केली होती. पहिल्या आणि चौथ्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करावा लागला होता. त्यामुळे हा सामना राखीव म्हणजे सहाव्या दिवशीही खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांत आटोपला होता, ज्याचे उत्तर देताना न्यूझीलंडने २४९ धावा करत पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवली होती.

भारताचा दुसरा डाव १७० धावांत आटोपला 

दुसऱ्या डावात भारताला केवळ १७० धावा करता आल्या. भारताकडून रिषभ पंत (४१) आणि सलामीवीर रोहित शर्मा (३०) यांनी चांगली फलंदाजी केली. परंतु, त्यांना इतरांची साथ लाभली नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. भारताचा दुसरा डाव १७० धावांत आटोपल्याने न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी १३९ धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी ८ विकेट राखून पूर्ण केले.