भारत सरकारने कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अॅप लाँच केले आहे. सरकार या अॅपच्या माध्यमातून कोरोना बाधित रूग्णांचे लोकेशन शोधू शकणार आहे. याशिवाय युजर्स हेकोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आहेत की नाही याची माहितीदेखील समजू शकणार आहे. हे अॅप लाँच करण्याआधी सरकारने कोरोना कवच या नावाचे देखील अॅप लाँच केले होते.
आरोग्य सेतू असे करेल काम
हे अॅप युजर्सच्या स्मार्टफोनचे लोकेशन ट्रॅक करेल. सोबतच कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात युजर्स आहे की नाही हे ब्लूटूथच्या माध्यमातून शोधण्यास या अॅपची मदत होऊ शकते. तसेच युजर्स आणि कोरोनाबाधित रूग्ण यांच्यात किती अंतर आहे समजण्यास मदत होणार असून कोरोनापासून कसे संरक्षण करावे याच्या टिप्स देखील यामध्ये वाचता येणार आहे.
कोरोनाच्या शंकाचे होणार निरसन
आरोग्य सेतू या अॅपमध्ये कोविड-19 संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी चॅटबॉट असा पर्याय युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये चर्चा केल्यानंतर युजर्सना या व्हायरसचे लक्षण आहे किंवा नाही हे देखील स्पष्ट होते. तसेच यामध्ये विविध राज्यांचे हेल्पलाइन नंबर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.