ठाण्यात सॅटिस पुलाखाली महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

Thane Satis bridge women give birth baby girl
सॅटिस ब्रिजखाली महिला बाळंतीन झाली

ठाण्याच्या सॅटिस पुलाखाली एका महिला रस्त्यावर बाळंत झाली असून मदतीसाठी आलेल्या पोलिसांनी तात्काळ महिलेला आणि बाळाला पुढील उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

ठाण्याच्या सॅटीस पुलाखाली एक महिला बाळंतीण झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु असल्याची माहिती ठाणे नगर पोलिस ठाण्याला गुरुवारी सकाळी ७ वाजता एका पादचाऱ्याने दिली. पोलिसांनी ताबडतोब महिला पोलीस शिपाईसह सॅटीस पुलाजवळ धाव घेतली. मात्र बाळाची नाळ कापली नसल्यामुळे रक्तस्त्राव सुरु होता. पोलीस शिपाई तरे आणि कांबळे या बिट मार्शल यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेतून बाळ आणि बाळंतीण या दोघांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळाची नाळ कापून महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. रेखा गुंजाळकर (२७) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला गजरे आणि कटलरी वस्तू विकते तर पती मोलमजुरी करतो. दोघेही सॅटीस पुलाखालीच राहतात.

रेखा गुंजाळकर या महिलेला पहाटेपासून प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या होत्या. पत्नीच्या पोटात दुखू लागल्यामुळे पती दत्ता गुंजाळकर हा गोंधळला होता त्याला काहीच सुचत नव्हते. अखेर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रेखा पुलाखाली उघड्यावर बाळंत झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. सध्या बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असून त्यांच्यावर रुग्णलायत उपचार सुरु असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी दिली.