ठाण्यात अपघातग्रस्त पेट घेतलेल्या रिक्षात अडकून महिलेचा जागीच मृत्यू

घोडबंदर रोडवरील घटना, रिक्षाचालक गंभीर जखमी

बेंगलोर वरून ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर रिक्षाने बोरिवली पूर्व येथे निघालेल्या महिलेचा अपघातग्रस्त पेट घेतलेल्या रिक्षात अडकून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख पोलीस चौकीजवळ घडली. मयत अनोळखी महिलेच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत. तर याप्रकरणी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या जखमी रिक्षाचालक राजेश कुमार यादव (४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी बोलताना दिली.

महिला या बेंगलोर येथून बुधवारी पहाटे ठाणे रेल्वे स्थानकावर उतरल्या होत्या. बोरिवली येथे जाण्यासाठी त्या रिक्षाचालक यादव याच्या रिक्षात बसल्या. बोरीवलीला जाणाऱ्या मार्गिकेवर पहाटेच्या सुमारास वाहतूक कोंडी असल्याने रिक्षाचालक यादव याने विरुद्ध दिशेने ( ठाणे येणाऱ्या मार्गिका) रिक्षा घेऊन जात होता. गायमुख पोलीस चौकीजवळ आल्यावर रिक्षाचालक पुन्हा ठाण्याकडून बोरीवलीला जाणाऱ्या मार्गिकेवर जात असताना, त्याचवेळी समोर आलेल्या एका वाहनाने त्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा उलटली आणि त्या रिक्षाने अचानक पेट घेतला. या घटनेत ती महिला त्या रिक्षामध्ये अडकल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक यादव हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती पोलीस हवालदार प्रदीप भालेराव यांनी दिल्यावर घटनास्थळी गायमुख पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, रिक्षाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम तातडीने हाती घेतले. मात्र रिक्षात अडकलेल्या महिलेला त्यांना वाचविण्यात यश आले नाही. त्या अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे तसेच तिच्या नातेवाईकांना शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात लोकमान्य नगर येथील रिक्षाचालक यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबशेट्टी यांच्यामार्गदर्शनाखाली सुरू आहे.