बचत गटातील महिलेचे उत्पन्न मासिक दहा हजार करण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची ग्वाही, वज्रेश्वरी ब्रॅण्ड देशात पोचविणार -कपिल पाटील

देशभरात बचत गटात सहभागी झालेल्या ९ कोटी महिला भगिनींचे उत्पन्न वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीकोनातून मोदी सरकारने ६ लाख २६ हजार कोटी रुपयांचा निधी बचत गटांना उपलब्ध करुन दिला, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास व पंचायती राज राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी आज येथे केले. आगामी काळात प्रत्येक महिलेचे उत्पन्न मासिक १० हजार रुपये करण्याचा मोदी सरकारचा निर्धार असून, लखपती दीदी ही संकल्पना राबविली जात आहे, असे ते म्हणाले.ठाणे जिल्ह्याचा वज्रेश्वरी ब्रॅण्ड हा देशपातळीवर पोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद, ठाणे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने आसनगाव येथे आयोजित केलेल्या स्वयंसहाय्यता गटातील महिलांची कार्यशाळा व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील होते. या कार्यशाळेला २५ हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. या वेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, दशरथ तिवरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, सुभाष हरड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, आसनगावचे सरपंच रविना कचरे, उपसरपंच राहुल चंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

गिरीराज सिंह म्हणाले, `कॉंग्रेसच्या काळात महिला बचत गटांना कर्जासाठी केवळ ८६ हजार कोटी रुपये उपलब्ध झाले होते. तर मोदी सरकारने देशभरातील ८६ लाख बचतगटांतील ९ कोटी भगिनींना ६ लाख २६ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध केले. २०१४ पूर्वी केवळ २ कोटी ३५ लाख महिला बचत गटांमध्ये कार्यरत होत्या. आता ती संख्या ९ कोटींपर्यंत पोचली आहे. येत्या २०२४ पर्यंत १० कोटी महिला भगिनींना जोडले जाणार आहेत. महिलांना दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापरही करून, ड्रोन उडविण्याचेही प्रशिक्षण घ्यावे. त्यादृष्टीकोनातून बचतगटांनी प्रयत्न करावेत. बचतगटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, जेम पोर्टल आणि सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयत्न करावा, अशी सुचना सिंह यांनी केली.
कपिल पाटील म्हणाले, मुंबई-ठाणे शहरासारखी मोठी बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. दूध व भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्यास बचतगटांना मोठे उत्पन्न मिळू शकेल. शिवकाळातील हिरकणीप्रमाणे महिलांनी आत्मविश्वासाने बचत गटाचे कार्य करून आर्थिक प्रगती करावी. जिल्ह्यातील महिलांनी तयार केलेला `वज्रेश्वरी’ ब्रॅण्ड हा देश पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतमध्ये सोलर पॉवरचा उपयोग करण्यात येणार असून यासाठी लागणारे पॅनल महिला बचतगटांनी तयार केलेले असावे अशी इच्छा आहे. बचत गटाच्या महिलांचा समूह गट तयार करून केळीचे उत्पादन घेण्यात येणार आहे. या वेळी महिला बचत गटाच्या पुस्तिकेचे प्रकाशन व सुषमा स्वराज पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच यशस्वी बचतगटांचा गौरव करण्यात आला.

बचतगटांना कर्जाची जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ हमी
ठाणे जिल्ह्यातील बचतगटांतील महिला सदस्यांचे उत्पन्न किमान दहा हजार रुपये व्हावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी-जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी सुचना करीत बचतगटांना कर्जासाठी सर्व प्रशासकीय पूर्तता करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिले. त्यावेळी गाय, म्हशी, बकरी, शिलाई मशीन आदी साहित्याच्या पुरवठ्यासह कर्जाबाबत आवश्यक मदत करण्याची हमी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.