Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम टिश्यू पेपर मागितला म्हणून वेटरने केली ग्राहकाची हत्या!

टिश्यू पेपर मागितला म्हणून वेटरने केली ग्राहकाची हत्या!

Related Story

- Advertisement -

टिश्यू पेपरवरून झालेल्या वादातून ३ वेटरने केलेल्या मारहाणीत २८ वर्षांच्या रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील आनंद नगर येथील एका जेवणाच्या ढाब्यावर घडली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ढाब्यावर काम करणाऱ्या ३ वेटर्सला अटक करण्यात आली आहे. नवनाथ खाशाबा पावणे (२८) असे या घटनेत मृत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. मुलुंड पश्चिमेतील इंदिरा नगर येथे राहणारा नवनाथ ९ नोव्हेंबर रोजी दुपारी जेवण करण्यासाठी ठाणे पूर्व आनंद नगर येथील ‘बाबा का ढाबा’ या ठिकाणी गेला होता. जेवण झाल्यानंतर नवनाथ याने वेटरकडे हात पुसण्यासाठी टिश्यू पेपर मागितला. वेटरने टिश्यू पेपर आणून दिला. मात्र, टिश्यू पेपरला भाजीचे तेल लागल्यामुळे त्याने वेटरला पुन्हा हाक मारून दुसरा टिश्यू पेपर घेऊन येण्यास सांगितले.

मात्र, ‘यही टिश्यू पेपर है, मंगता है तो लो’ असे उत्तर वेटरने नवनाथला दिले. यामुळे संतापलेल्या नवनाथने वेटरला अपशब्द वापरल्यामुळे वेटर आणि नवनाथमध्ये शाब्दिक वाद होऊन वादाचे रूपांतर मारहाणीपर्यंत पोहोचले असता, या वेटरच्या मदतीसाठी इतर दोघे वेटर धावत आले आणि तिघांनी मिळून नवनाथला बेदम मारहाण करून ढाब्याबाहेर काढून दिले.

- Advertisement -

नवनाथ बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ ढाब्याच्या बाहेर पडून होता. काही वेळाने त्या ठिकाणी जेवणासाठी आलेल्या इतर रिक्षाचालकांना नवनाथ बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला आणि त्यांनी लागलीच नवनाथला मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. नवनाथ पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असल्याचे नवनाथच्या कुटुंबियांना सहकारी रिक्षाचालकाकडून सांगण्यात आले. नवनाथवर रुग्णालयात उपचार सुरु असताना १३ नोव्हेंबर रोजी रात्री नवनाथचा मृत्यू झाला. नवनाथच्या मृत्यूबाबत मोठ्या भावाला संशय आल्यामुळे त्याने माहिती काढली असता नवनाथचे ढाब्यावर भांडण झाले होते अशी माहिती भावाला कळली. नवनाथच्या भावाने या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता नवनाथच्या मृत्यूचे कारण पुढे आले आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ढाब्यावर काम करणारे वेटर रामलाल गुप्ता, दिलीप भारती आणि फिरोज खान या तिघांना अटक केली असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली.

- Advertisement -