केतकी चितळेच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून

actor ketaki chitale arrested over facebook post on ncp sharad pawar allegations

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. केतकीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी अपूर्ण आहे. तपास अधिकारी आणि वकीलांच्या अभिप्रायासाठी हा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केतकीची आजची रात्र ठाणे मध्यवर्ती कारागृहात जाणार आहे.

केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर केतकीच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणातील तपास अधिकारी आणि वकील यांच्या अभिप्रायासाठी निर्णय राखीव ठेवला आहे. पुढची सुनावणी तपास अधिकारी आणि वकीलांच्या अभिप्रायानंतर घेण्यात येणार आहे.

यावेळी केतकीवर मानहानीचा दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे, ज्या व्यक्तीचे नाव पोस्टमध्ये आहे त्याच व्यक्तीने तो दाखल करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे केतकीचा देखील विनयभंग करण्यात आला आहे, तिला मारहाण करण्यात आली आहे. त्यावर गुन्हा अजूनही दाखल झालेला नाही, तो लवकरात लवकर दाखल करावा. ज्या गुन्ह्यात तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, त्यामध्ये पोलिस कस्टडीची आवश्यकता नसते, तरीदेखील केतकीला पोलिस कस्टडी देण्यात आली, ही झुंडशाही आहे, असा युक्तीवाद केतकी चितळेच्या वकीलांनी केला.