घरठाणेठाणे परिवहन घोटाळा प्रकरणी ८ अधिकाऱ्यांसह १० जणांवर गुन्हे

ठाणे परिवहन घोटाळा प्रकरणी ८ अधिकाऱ्यांसह १० जणांवर गुन्हे

Subscribe

एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश

ठाणे महानगर परिवहन विभागात (टीएमटी) बसथांबा उभारणीच्या मोबदल्यात जाहीरात करण्याच्या कंत्राटमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे महानगर परिवहन विभागाच्या आठ अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. हा घोटाळा एकूण ६ कोटी ७३ लाख ५५ हजार रुपयांचा आहे. या प्रकरणाची चौकशी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे महानगर परिवहन सेवा यांच्याकडून महानगरपालिकेच्या हद्दीतील ४७० बस प्रवासी थांब्यावर  मे. सोल्युशन अॅडव्हर्टायजिंग या कंपनीला पीपीपी तत्वावर जाहिराती करण्याची परवानगी देण्यात आली होती. या कामामध्ये परिवहन समितीतील तत्कालीन सदस्य आणि अधिकारी यांनी संगनमताने या कंत्राटात गैरव्यवहार झाला होता. २००८ पासून ते २०१८ या कालावधीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनवाईच्या दरम्यान गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका आठवड्यात गुन्हा दाखल करू अशी हमी मुंबई उच्च न्यायालयात दिली होती.

- Advertisement -

एका आठवड्याची मुदत मंगळवारी संपत असताना सोमवारी रात्री याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक ज्योती देशमुख यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तत्कालीन परिवहन व्यवस्थापक ठाणे अशोक करंजकर(५२),  तत्कालीन परिवहन व्यवस्थापक श्रीकांत सरमोकदम (सेवानिवृत्त), कमलाकर दीक्षित (६७) उपव्यवस्थापक परिवहन सेवा ठाणे, अजित निऱ्हाळे (६०) तत्कालीन मुख्यलेखापाल, गुरुकुमार पेडणेकर (६७) वाहतूक अधीक्षक, पिटर पिंटो (५९) लेखा परीक्षक, लक्ष्मीकांत धुमाळ ( ५४) सुरक्षा अधिकारी, दिलीप कानडे (५५) वाहतूक निरीक्षक, प्रवीण मथुरभाई सोळंखी (५२) खासगी इसम आणि भावेश भिंडे खासगी इसम ( एमडी गुज्जू अॅडव्हर्टायजिंग) असे गुन्हे दाखल झालेल्या अधिकारी आणि खासगी इसमांची नावे आहेत.   या सर्वानी मिळून खोटी कागदपत्रे सादर करून संगनमताने ६ कोटी ७३ लाख ५५ हजार रुपयांचा गैरव्यवहार करून ठाणे परिवहन सेवा विभागाची फसवणूक केली आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -