घरठाणेकंत्राटदाराला लाल कार्पेट अंथरूनही ठाण्यात सायकल योजना पंक्चर!

कंत्राटदाराला लाल कार्पेट अंथरूनही ठाण्यात सायकल योजना पंक्चर!

Subscribe

तब्बल २२ लाख लोकसंख्या ठाणे शहरात अवघ्या ५०० सायकलींच्या साह्याने पर्यावरण संवर्धन आणि वाहतुकीचे कोंडी दूर होण्याचे दिवास्वप्न दाखविणाऱ्या ठाणे महापालिकेची बहुचर्चित सायकल योजना पंक्चर झाली आहे. शहरातील बहुसंख्य स्टॅण्डवरील सायकली गायब झाल्या असून, काही ठिकाणी अवघ्या ३ ते ४ उभ्या आहेत. मात्र, खाजगी कंत्राटदाराला लाखो रुपये मिळवून देणाऱ्या जाहिराती बिनदिक्कतपणे झळकत आहेत. या प्रकाराकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले असून, सायकल स्टॅण्ड महापालिकेच्या ताब्यात घेऊन जाहिराती काढून टाकण्याची मागणी केली आहे.

ठाणे शहर `स्मार्ट सिटी’ होणार असल्याची चर्चा घडवून, एका कंपनीला शहरातील महत्वाच्या ५० ठिकाणी स्टॅण्डसाठी मोफत जागा देण्यात आली. त्याचबरोबर खेवरा सर्कल येथील महापालिकेच्या इमारतीतील दोन मजले मोफत दिले. तसेच, सायकल स्टॅण्डवर होणाऱ्या जाहिरातीसाठी महापालिकेकडून कोणताही कर आकारला जात नाही. त्याबदल्यात या कंपनीने सुमारे अडीच वर्षांपूर्वी केवळ ५०० सायकली दिल्या. या सायकलची किंमत केवळ १७ लाख ५० हजार रुपये होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असा `बुद्धी गहाण ठेवणारा’ करार केला होता, याकडे भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

ठाणे शहरातील महत्वाच्या व जाहिरातींच्या फलकाचे `बक्कळ’ भाडे मिळणाऱ्या भागात कंत्राटदाराने सायकल स्टॅण्ड उभे केले आहेत. ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळ रेल्वे स्टेशन परिसरात आहे. मात्र, या ठिकाणी स्टॅण्ड न उभारता शहरातील मोक्याची ठिकाणे, पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर रोड, पोखरण रोड क्र. १ आणि २, कापूरबावडी आदी ठिकाणांना जाहिरातींसाठी पसंती दिली गेली. नौपाडा, कापूरबावडी, विवियाना मॉलसमोर पदपथावर स्टॅण्ड उभारून जाहिरात फलक लावले गेले. तर नौपाडा भागात कॉक्रिट रस्ते फोडण्याचा प्रतापही कंत्राटदाराने केला. पालिकेने कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतरही, नागरिकांकडून भाडे आकारले जात होते. त्यामुळे ही योजना पूर्णपणे फसली. आता शहरातील बहुसंख्य सायकल स्टॅण्ड रिकामे पडले आहेत. ३ ते ४ सायकली वगळता या स्टॅण्डवर सायकली उपलब्ध नाहीत. उपलब्ध सायकलींचेही हॅंडल आणि चेन तुटलेली असते. मात्र, या ठिकाणी बिनदिक्कतपणे जाहिराती लावून लाखो रुपये भाडे कंत्राटदाराच्या तिजोरीत जात आहेत. याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर कराराचा भंग केल्यामुळे संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच सायकल स्टॅण्ड पोस्ट ताब्यात घेऊन जाहिराती काढून टाकाव्यात, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

जाहिरात फलक ताब्यात घ्यावे : नारायण पवार

संबंधित सायकल कंत्राटदाराबरोबर महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारा करार महापालिका प्रशासनाने केला. या करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्याची चौकशी करावी. तसेच महापालिकेचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणीही भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. महापालिकेची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कंत्राट रद्द करून जाहिरात फलक ताब्यात घेऊन निविदा काढाव्यात. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढू शकेल, असे मत नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -