Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक

रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक

आरोपींना २० मे पर्यंत पोलीस कोठडी

Related Story

- Advertisement -

दिवसाढवळ्या भर रस्त्यावर रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या ९ जणांच्या टोळीपैकी ५ जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंबरनाथ ( पूर्व ) येथील बी कॅबिन रोडजवळ बुद्धघोष हौसिंग सोसायटीमधील छाया अपार्टमेंट या इमारतीत विजय नवलगिरे ( ३० ) हा रिक्षाचालक त्याची पत्नी दर्शना विजय नवलगिरे ( २०) हिच्यासोबत राहत होता. एक वर्षांपूर्वी विजय व दर्शना यांचा प्रेमविवाह झाला होता.  पूर्वी अंबरनाथ ( प ) येथे बालाजी नगर येथे राहणारी दर्शना व विजय यांचे प्रेमसंबंध होते. मात्र दोघेही वेगळ्या समाजाचे असल्याने दर्शनाच्या घरच्यांनी तिला विजय पासून दूर राहण्यास सांगितले. मात्र त्यानंतर देखील या दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्याचप्रमाणे विजयने तक्रार केल्यामुळे बालाजी नगर परिसरातील एक ताडी केंद्र देखील बंद पडले होते.

या गोष्टीचा राग आरोपी जगदीश उर्फ जग्गु मुंगर, कालिदास हनुमंत कोळी, जयेश सरनप्पा पानधी, राजू गोविंद कोळी, सोनू स्वामी, राजू निंधी, आनंद , चिंटू आणि एक अन्य आरोपी यांच्या मनात खदखदत होता. आरोपींनी विजय नवलगिरे याला संपविण्याचा कट केला होता. गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सर्व आरोपी विजयच्या घराजवळ आले आणि त्यांनी लाथा मारून त्याच्या घराचा दरवाजा तोडला विजयला लाथाबुक्क्यांनी आणि तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली. यावेळी विजयला वाचविण्याचा त्याची पत्नी दर्शना हिने आरडाओरड केली. त्यावेळी आरोपींच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी तिला देखील मारहाण करून बाजूला ढकलून दिले.

- Advertisement -

बेशुद्ध झालेल्या विजयला आरोपींनी इमारतीबाहेर रस्त्यावर फरफटत आणले व त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने प्रहार केले. या प्रकारामुळे बघ्यांची गर्दी जमा झाली. कोणीही मध्यस्थी करून विजयला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आरोपींनी हत्या केल्यानंतर देखील त्यांनी पळून जाण्याची घाई केली नाही तर बघ्यांच्या गर्दीसमोर त्यांचा आरडाओरडा व शिवीगाळ सुरूच होती. शिवाजीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी येत असल्याची कुणकुण लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आरोपी जगदीश उर्फ जग्गु मुंगर, कालिदास हनुमंत कोळी, जयेश सरनप्पा पानधी, राजू गोविंद कोळी, राजू शिरसाट यांना अटक केली. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. अटक आरोपींना उल्हासनगर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे हे करीत आहेत.

- Advertisement -