घरठाणेजामिनावर सुटून काही तासातच केल्या १५ सोनसाखळ्या लंपास

जामिनावर सुटून काही तासातच केल्या १५ सोनसाखळ्या लंपास

Subscribe
तुरूंगातून सुटतो ना सुटतो तोच पुन्हा चोऱ्यांचा सपाटा लावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.  जामिनावर सुटून तुरुंगातुन बाहेर पडताच त्याने पुन्हा महिलांच्या गळयातील सोनसाखळ्या चोरीचा सपाटा लावत ठाणे, मीरा रोड, मुंबई परिसरातील १५ महिलांचे गळे साफ केले होते. अखेर पोलिसांनी लावलेल्या जाळ्यात अलगत अडकत  पुन्हा एकदा त्याला तुरुंगाच्या वारीला जावे लागले आहे. नुकताच तुरुंगातून बाहेर पडलेल्या सराईत  सोनसाखळी चोर मोहम्मद इसरार इस्राईल खान याला कासारवडवली पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला करण्यात आला आहे.
मोहम्मद इसरार खान (३९) हा मीरारोड येथे राहणार असून सराईत सोनसाखळी चोर आहे. वर्षभरापूर्वी त्याला सोनसाखळी चोरीच्या गुन्हयात अटक करण्यात आली होती. चोरीच्या गुन्हयात तुरुंगात असणारा मोहम्मद खान याला लॉकडाऊन मध्ये न्यायालयाने जामीन दिला होता. जामीनावावर तुरुंगातून बाहेर पडलेल्या मोहम्मद खान याने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून एकट्या दुकट्या फिरणाऱ्या महिलांना लक्ष करण्यास सुरुवात केली होती. मुंबई, मीरारोड, ठाणे शहरात मोहम्मदने मोटारसायकलवरून एकट्याने येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचण्याचा सपाटा लावला होता.
शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हावरे सिटी येथील डब्बा गरम या हॉटेल जवळ एका महिलांच्या गळयातील सोनसाखळी खेचून पळ काढला होता. या घटनेची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी तात्काळ परिसरात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या वर्णनावरून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याच वर्णनाची दुचाकी नाकाबंदीत ताब्यात घेऊन मोहम्मद ईसरार खान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्हयाची कबुली देत जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्याने १५ सोनसाखळ्या चोरीचे गुन्हे केल्याची देखील कबुली दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मोहम्मद खान यांच्याकडून गुन्हयातील १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -