महावितरणच्या वाटचालीत जनमित्रांचा वाटा सिंहाचा

सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे गौरवोद्गार, कल्याण परिमंडलात लाईनमन दिवस उत्साहात

स्वत:च्या घरातील प्रकाशाची फिकीर न करता ग्राहकांच्या घरातील उजेड कायम ठेवण्यासाठी समर्पक भावनेने काम करणारे जनमित्र अर्थात लाईनमन हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. तत्कालिन वीज मंडळ आणि त्यानंतरच्या महावितरणच्या वाटचालीत या जनमित्रांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीस संचालक चंद्रकांत डांगे यांनी काढले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वीज वितरण व्यवस्थेतील महत्वपूर्ण घटक असलेल्या जनमित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी, चार मार्च, सायंकाळी कल्याण परिमंडल कार्यालयात आयोजित लाईनमन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील आणि दिलीप भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी लाईनमनची ओळख असलेला खाकी वेष परिधान करून कार्यक्रमाला हजेरी लावत जनमित्रांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सहव्यवस्थापकीय संचालक श्री. डांगे म्हणाले, कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कठीण परिस्थितीचा व विशेषत: त्यांच्याविषयीच्या नकारात्मक वातावरणाचा यशस्वीपणे सामना करत जनमित्रच वीजपुरवठा सुरळीत राखण्याचे काम करतात. समाज, सरकार व वीज वितरण कंपन्या कायम त्यांच्या ऋणी आहेत व या ऋणातून थोडेफार उतराई होण्यासाठीच लाईनमन दिवसाची स्तुत्य संकल्पना उदयास आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य अभियंता औंढेकर यांनी मार्गदर्शन करताना लाईनमन दिवस साजरा होत असल्याचा क्षण ऐतिहासिक आहे व यातून वर्षभर अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा जनमित्रांना मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. अधीक्षक अभियंता दीपक पाटील आणि दिलीप भोळे यांनीही मार्गदर्शन करताना जनमित्रांच्या योगदानाचे भरभरून कौतूक केले.
प्रशिक्षण केंद्राच्या उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर यांनी उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन खबरदारीबाबत उदाहरणांसह प्रबोधन केले. तसेच महिला व पुरुष जनमित्रांनी काम करताना त्यांना येणारे अनुभव कथन केले. यावेळी मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, सहायक अभियंते, कर्मचारी व ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ते जनमित्र या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता स्मीता काळे यांनी केले. तर अधीक्षक अभियंता पाटील यांनी आभार मानले.