ठामपाच्या २७ पैकी २० आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

विरोधीपक्ष नेत्यांनी केला पर्दाफाश

एकीकडे ठाणे शहरात सर्दी, खोकला आणि तापाची साथ सुरू आहे. मात्र, दुसरीकडे ठामपाच्या सर्वच दवाखान्यात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तर, ‘आपला दवाखाना’ मध्ये वैद्यकीय अधिकारी गायब असल्याचा पर्दाफाश विरोधीपक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी गुरुवारी केला.

अशरफ पठाण आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी गुरूवारी ठामपाच्या विविध आरोग्य केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला.
पालिका आरोग्य केंद्रात औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यानुसार  कळवा येथील आरोग्य केंद्रात जाऊन पठाण यांनी औषधांचा साठा तपासला असता तेथे अत्यल्प साठा असल्याचे दिसून आले. तेथील कर्मचाऱ्यांनी व्हिटामीन सी, कॅल्शियम,  हँडवाॅश, सह अनेक औषधांचा  तुटवडा आहे. शिवाय जी औषधे दहा हजार मागितली आहेत; ती केवळ पाचशे दिली असल्याचे सांगितले.

ठामपा संवेदनशील नाही
यावेळी शानू पठाण यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. “सध्या महामारीचा कालखंड सुरू आहे. आरोग्यासारख्या गंभीर विषयावरही ठामपा प्रशासन संवेदनशील नाही. येथील आरोग्य केंद्रातून मागणी केल्यानंतरही औषधांचा पुरवठा करण्यात येत नाही. स्टाॅकमध्ये औषधे नसल्याचे कारण पुढे करून रूग्णांना औषधे पुरविण्यात येत नाहीत. याबाबत आयुक्तांनीच स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. एकीकडे नागरी सुविधांसाठी निधी देण्यात येत नाही. तर दुसरीकडे ज्या कोरोनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. त्याच रोगराईसाठी औषधे दिली जात नाहीत, .ठाणे, कळवा,  मुंब्रा भागातील २७ पैकी २० आरोग्य केंद्रात औषधांचा साठाच उपलब्ध नाही. मोठ्या गाजावाजा करून सुरू केलेला आपला दवाखानाही बंदावस्थेत आहे.  नागरिकांना जर आरोग्याची मूलभूत सेवा पुरवता येत नसेल तर ते नक्कीच लाजीरवाणे आणि पालिकेच्या कारभारावर प्रश्न निर्माण करणारे आहे. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही, हेच स्पष्ट होत आहे. या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी पालिका आयुक्तांनी सभागृहात उपस्थित राहणे गरजेचे आहे,” असे पठाण यांनी सांगितले.