मुंबई – नाशिक महामार्गवर कंटेनर, कार, दुचाकीमध्ये भीषण अपघात

कंटेनर विद्युत पोलला धकडल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित

मुंबई – नाशिक महामार्गवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर, कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त कंटेनर विद्युत पोलला धकडल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता.या भीषण अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर अपघाताची नोंद वाशिंद पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
शहापूर तालुक्यातील खातिवली गावाच्या हद्दीतील मुंबई -नाशिक महामार्गावरून मुंबईच्या दिशेने मंगळवारी रात्रीच्या सुमारास अवजड कंटेनर भरधाव जात होता.

त्याच सुमारास भिवंडी तालुक्यातील इताड -सावदा गावात राहणारा एक तरुण मित्रासोबत दुचाकीवरून तर वॅगनर कारमध्ये कल्याण परिसरात राहणारे डॉक्टरही त्यांच्या सहकाऱ्यासोबत मुंबईच्या दिशेनेच जात होते. त्याच सुमाराला अचानक कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरील दोघांसह वॅगनर कारला खातिवली गावाच्या हद्दीतील धिंग्रा हॉटेलसमोर कंटेनरने जोरदार धडक देऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलवर जाऊन कंटेनर आदळला. त्यामुळे स्फोट झाला आणि खातिवलीसह वाशिंद गावातील वीजपुरवठा खंडित झाला.

अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आणि कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. शिवाय विद्युत पोलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघात स्थळी राजेश निकम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दुचाकीवरील एका गंभीर जखमींला उपचारासाठी ठाण्याच्या कळवा रुग्णालयात दाखल केले. तर कंटेनर चालकाला शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या भीषण अपघातात कारमधील दोघांना किरकोळ मार लागल्याने प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत कंटेनर चालक बबलू यादव याच्याविरोधात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी चालकावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस तपास अधिकारी सचिन घुडे यांनी दिली असून उपचारानंतर कंटेनर चालकाला अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.