घरठाणेमुरुडकर यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा

मुरुडकर यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा

Subscribe

धर्मराज्य पक्षाची मागणी

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ठाण्यातील कोरना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांना बेड न मिळण्याचे प्रकार समोर येत आहेत. आरोग्य यंत्रणेवर महारीचे संकट आले आहे. अशातच काल ठाण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली होती. ठाणे महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी महापालिकेत व्हेंटिलेटर पुरविण्यासंबंधीची निविदा मंजूर करुन घेण्यासाठी , तब्बल १५ लाख रुपयांची मागणी संबंधित ठेकेदार कंपनीकडे केली होती. त्यापैकी ५ लाखांची लाच स्वीकारताना मुरुडकर यांना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असला, तरी ही घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात दाखल करण्याबाबतची शिफारस ठाणे महापालिका प्रशासनाने करावी, अशी मागणी मागणी धर्म राज्य पक्षाने केली आहे.

 

- Advertisement -

सद्यस्थितीत ठाणे – मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन राज्य शासनाच्या आदेशानुसार कठोर निबंधांची अंमलबजावणी करीत असताना आणि सर्वसामान्य जनतेच्या जीविताची काळजी घेत असताना. आरोग्य विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अशापद्धतीच्या महामारीच्या काळातच आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या व्हेंटिलेटरच्या निविदेसंदर्भात लाच स्वीकारणे म्हणजे, हा प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच प्रकार नव्हे का ? ‘ असा प्रश्न यानिमित्ताने कोणत्याही सर्वसामान्य करदात्या नागरिकाच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, ठाणे महापालिकेत अशा प्रकारचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जी दक्षता समिती असते, त्यांनी हा प्रकार नजरअंदाज केल्याबद्दलही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते, असे धर्म राज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे म्हणाले.

सध्या राज्यासहित संपूर्ण भारतात कोरोनाचे संकट आले आहे. देशभरात कोरोनासंबंधी चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि इतर महत्त्वाचे प्रशासकीय विभाग जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात गुंतलेले असताना, ठामपा प्रशासनातील मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने आपत्कालीन परिस्थितीचा गैरफायदा उठवत, थेट पाच लाखांची लाच स्वीकारावी यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट ती काय असावी. याच अनुषंगाने आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की, जर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उच्चपदस्थ अधिकारी अशाप्रकारचा भ्रष्टाचार करीत आहेत. तर इतर महत्त्वाच्या विभागांत काय परिस्थिती असावी आणि त्यांचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे ? याचीही आता सखोल चौकशी करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. नवी मुंबईतील ज्या ठेकेदार कंपनीमार्फत ठाणे महापालिकेत ३० व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात येणार होता, त्याच कंपनीच्या वतीने डॉ. राजू मुरुडकर यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करुन, सदर भ्रष्टाचारी प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल, ठामपा प्रशासनाने त्याच कंपनीला व्हेंटिलेटर्स पुरवठ्यासंबंधी ठेका देऊन, त्यांचा यथोचित सन्मान करावा. डॉ. मुरुडकर यांची आरोग्य अधिकारी म्हणून, त्यांची डिग्री रद्द करण्याची मागणी इंडियन मेडिकल कोन्सिलकडे (आय.एम.सी) करण्यात यावी. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याबाबत जलदगती न्यायालयात शिफारस करण्यात यावी. अशी मागणी धर्मराज्य पक्षाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -