घरठाणेकेशरी रंगाच्या ट्रंकमुळे पोलीस पोहोचले मारेकर्‍यांपर्यंत

केशरी रंगाच्या ट्रंकमुळे पोलीस पोहोचले मारेकर्‍यांपर्यंत

Subscribe

शिळ डायघर पोलिसांना रमजान ईदच्या आदल्या दिवशी मिळून आलेल्या ट्रंकेतील मृतदेहाची ओळख पटवून एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. केशरी रंगाच्या वेगळ्याच असणार्‍या ट्रंकेमुळे पोलीस मारेकर्‍यापर्यंत 48 तासाच्या आत पोहोचले. ही ट्रंक मुंबईतील एका ठिकाणाहून विकत घेण्यात आली होती. मुंब्रा रेतीबंदर खाडीच्या परिसराचा काही भाग शिळ डायघर पोलिसांच्या हद्दीत येतो. दोन दिवसांपूर्वी म्हणजे रमजान ईदच्या आदल्या दिवशी या खाडीतून एका गर्द केशरी रंगाची ट्रंक वाहत खाडीच्या किनार्‍यावर आली होती. शिळ डायघर पोलिसांनी ही ट्रंक ताब्यात घेऊन उघडली असता त्यात एका पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता. मृतदेहाची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू पोलिसांना ट्रँकेत अथवा मृतदेहाजवळ मिळाली नव्हती. पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात चौकशी सुरू केली.

तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयात येणार्‍या पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींची माहिती मिळवली. मात्र मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी उलटा तपास सुरु केला. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, रामचन्द्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक कापडणीस, सरफरे, आरळेकर, तागड यांचे पथक तयार करण्यात आले होते.

- Advertisement -

या पथकाने पत्र्याची ट्रंक कुठे बनवली जाते याचा शोध घेतला असता, या प्रकारची ट्रंक केवळ तळोजा आणि मुंबईत एका ठिकाणी बनते अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. पोलीस पथकाने प्रथम तळोजा येथे जाऊन चौकशी केली असता ही ट्रंक आम्ही बनवली नसल्याची माहिती तळोजा येथील ट्रंक बनवणार्‍याने दिली. मात्र अशीच ट्रँक मुंबईत तयार होते, अशी माहिती तळोजा येथील ट्रंक बनवणार्‍याने तपास पथकाला दिली. तपास पथकाने मुंबई गाठून ट्रँक बनवणारा शोधून काढला आणि त्याने हर ट्रंक आपणच बनवू शकतो, असे सांगितले. गेल्या महिन्यात या ट्रंक बनवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, या ट्रंक नेमक्या कुणाला विकल्या याची माहिती त्याच्याकडे नव्हती. मात्र नंतर त्याने एक महिला आणि एका तरुणाने ही ट्रंक नेल्याची माहिती पोलिसांना दिली.

एवढ्या माहितीवरून डायघर पोलीस पथकाने दिवा गावात शोध सुरु केला. आपले खबरी आणि तांत्रिक माहितीच्या जोरावर तपास पथकाला मारेकर्‍यांपर्यंत पोहोचण्यात यश आले. दिवा गाव येथे राहणारी महिला अनिता यादव आणि तिचा भाऊ विजय भलारे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत इसम मनीष कुमार यादव (30) याच्यासोबत अनिता ही लग्न न करता मागील 2 वर्षांपासून राहत होती.

- Advertisement -

पहिल्या पतीच्या निधनानंतर मनीष सोबत राहणार्‍या अनिताने मनिषला लग्नासाठी विचारले होते. मात्र, मनिषने लग्न करण्यास नकार दिला. मनिष लग्नाला नकार देत असल्याचे बघून अनिता आणि विजय या भावंडांनी मनीषला कायमचा संपवण्याची योजना महिन्याभरापूर्वीच आखली होती. यासाठी त्यांनी मुंबईतून ट्रंक आणून ठेवली होती. 6 मे रोजी या दोघांनी मिळून मनीषची हत्या केली आणि मृतदेह ट्रंकेत टाकून ट्रंक खाडीत सोडून दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -