ठाण्यात वार्‍यासह पाऊस; उल्हासनगरात एकाचा मृत्यू

रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार वार्‍यासह पावसाची दमदार हजेरी

Thane tutke cyclone

चक्रीवादळामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार वार्‍यासह पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर वारा आणि पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. चोवीस तासात ठाण्यात 188 मिमी पावसाची नोंद झाली असून 60 हून अधिक ठिकाणी लहान-मोठी वृक्ष उन्मळून पडली. वृक्ष पडल्याच्या घटनांमध्ये अनेक गाड्यांसह चार घरांचे नुकसान झाले आहेत. त्यातच मुंब्रा येथील देसाई खाडी येथे लोखंडी जाहिरात फलक टेम्पोवर पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोघे जखमी झाले आहेत. उल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.

कल्याणातील ग्रामीण भागात वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे घरे आणि शेतीचेही नुकसान झाले. तर ठाण्यातील ग्रामीण भागात पत्रे उडाल्याने अनेकांचे नुकसान झाले. झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, शहापूर, उल्हासनगर, बदलापूर, वांगणी आदी भागातील वीज पुरवठा सोमवारी पूर्ण दिवस खंडीत झाला होता. त्यामुळे अनेक भागातील कोविड लसीकरण बंद होते. स्थानिक सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन धोक्याच्या सूचना आणि सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. भिवंडीत ग्रामीण भागात वादळाने मोठे नुकसान केले. अनेकांच्या घरांची पडझड झाली आणि वादळामुळे झाडे कोसळल्यामुळे अनेक नागरिक सुदैवाने थोडक्यात बचावले.

ठाण्यात झाड पडून डॉक्टर जखमी

शहरातील नौपाडा परिसरात एका कारवर झाड पडल्याने कारमधील डॉक्टर जखमी झाला आहे. तसेच शहाड येथील स्टेम प्राधिकरण येथे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा सकाळच्या सत्रात परिमाण झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दोन ठिकाणी इमारतींचा काही भाग कोसळला असून तीन झाडे धोकादायक झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. जोरदार वार्‍यासह पावसामुळे शहरात सोमवारी लसीकरण केंद्र बंद ठेवले होते. चक्रीवादळाची संभाव्य भीती लक्षात घेऊन लसीकरण ठेवल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

डोंबिवलीत रेल्वे वायरवर झाड पडल्याने आग

डोंबिवली रेल्वे रुळावरील ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने झाडाला आग लागली आणि पेटलेले झाड रुळावर पडले होते. पालिकेच्या कर्मचार्‍यांनी ताबडतोब रेल्वे प्रबंधकांना याची माहिती देत रुळावरील झाडाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर डोंबिवली पूर्वेकडील रिलायन्स ज्वेलर्सच्या बाजूकडील एका इमारतीच्या टेरेसवरील पत्रे वार्‍याने उडून गेले.