घरठाणेवालधुनी संवर्धनासाठी शासकीय यंत्रणांची बैठक

वालधुनी संवर्धनासाठी शासकीय यंत्रणांची बैठक

Subscribe

नदीतील प्रदूषण कमी करण्यावर चर्चा

अंबरनाथ शहराजवळ उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला मागील काही वर्षात रासायनिक प्रदूषणामुळे अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या नदीचे संवर्धन करण्यासाठी आता शासकीय यंत्रणा एकवटल्या आहेत. याच अनुषंगाने अंबरनाथ पालिकेत सर्व शासकीय यंत्रणांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नदी संवर्धनासाठी उपाययोजना आखण्यावर चर्चा करण्यात आली.

अंबरनाथ शहराजवळून उगम पावणारी वालधुनी नदी अंबरनाथ एमआयडीसी आणि पुढे अंबरनाथ शहरातून उल्हासनगर शहरात वाहत जाते. मात्र अंबरनाथ एमआयडीसीतल्या काही रासायनिक कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जाते. तर काही जीन्स वॉश कारखान्यांचे सांडपाणीही वालधुनी नदीत सोडले जाते. यामुळे गेल्या काही वर्षात या नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. याच नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वनशक्ती संस्थेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह एमआयडीसीला मिळून तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यातून या नदीचे पुनरुज्जीवीकरण केले जाणार होते.

- Advertisement -

मात्र त्यानंतरही या नदीत एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांकडून थेट रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे प्रकार पाहायला मिळत होते. मात्र या सगळ्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपन्यांवर काहीही कारवाई करत नव्हते. त्यामुळे  वालधुनी नदीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी अंबरनाथ पालिकेत शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. या बैठकीत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह एमपीसीबीचे विभागीय अधिकारी शंकर वाघमारे, एमआयडीसीचे अधिकारी, अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात काय उपायोजना करता येतील ? याची चर्चा करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -