ज्येष्ठ नागरिकांना पाणी, चहा बिस्कीट आणि लसही

ठाणे सिव्हील हॉस्पिटलने जपले आपुलकीचे नाते

 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून त्यामध्ये ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला जात आहे. त्यातच दुसर्‍या डोससाठी येणार्‍यांची संख्या जास्त असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. यामुळे पहिला डोससाठी येणार्‍या ज्येष्ठांना नोंदणी होऊपर्यंत ताटकळत राहावे लागते. त्यातच येणारी मंडळी लांबून येत असल्याने त्यांना चक्कर सारखे त्रास होऊ नये म्हणून ठाणे जिल्हा रूग्णालय प्रशासनाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरणासाठी आलेल्यांना विनामूल्य चहा बिस्कीट आणि पाण्याची बाटली देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दोन दिवसांत लस घेण्यासाठी आलेल्या ५०० ते ६०० नागरिकांनी चहा बिस्कीटचा आस्वाद चाखला आहे. त्यामुळे चहा,बिस्कीट, लस आणि ठाणे सिव्हील रुग्णालय अशी चर्चा शहरात सध्या सुरू आहे. त्यातच हा उपक्रम डोनर यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे.

कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंत (५मार्च) १ लाख १५ हजार २२९ जणांना पहिला तर २२ हजार ७७ जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. यामध्ये हेल्थकेअर आणि फ्रंड लाइन वर्कर्स आणि ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. त्यातच, ठाणे जिल्हा रुग्णालय आणि त्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयात १४ हजार ४३३ जणांनी पहिला आणि ४ हजार २१४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यातच, ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त असलेल्या २५१ आणि ६० वर्षांवरील १ हजार ४३० ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तिसर्‍या टप्प्यात लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी मिळाली. ही लस देण्यासाठी २५० रुपये मोजावे लागणार आहे. तरीसुद्धा ४ मार्चपर्यंत कुठेही खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू झाले नव्हते. त्यातच पहिला डोस घेण्यासाठी ४५ ते ६० वर्षापर्यंत व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह दुसरा डोस घेण्यासाठी हेल्थ केअर आणि फ्रंड लाइन वर्कर्स यांची केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे.

त्यातच, वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने या वेळखाऊ पणामुळे ज्येष्ठांना ताटकळत राहावे लागते. त्यातच ते लांबून येत असल्याने त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलाश पवार यांनी लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांना एखाद्या डोनरमार्फत चहा बिस्कीट देता येईल का? असे विचार पुढे येताच, रुग्णालय आहारतज्ज्ञ प्रिया गुरव यांनी पुढाकार घेत यासाठी ठाण्यातील एस बिस्वास यांना विचारले आणि त्यांनी त्या गोष्टीला होकार देत, तात्काळ चहासाठी लागणारी साखर, चहा पावडरसह बिस्किटे रुग्णालयात आणून दिली. त्यानंतर शुक्रवारपासून लसीकरणासाठी येणार्‍यांना चहा बिस्कीट देण्यास सुरू झाली असून मागील दोन दिवसांत ५०० ते ६०० नागरिकांनी चहा बिस्कीटचा आस्वाद घेतल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

तिसर्‍या टप्प्यात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जास्त आहे. तसेच ही मंडळी लांबून येत असल्याने त्यांना कोणताही त्रास होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. त्यातच डोनर यांची ही साथ लाभल्याने रुग्णालयात येणार्‍यांना चहा – बिस्कीट देण्याने शक्य होत आहे.
– डॉ.कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे