घरठाणेदिव्याला मिळणार अतिरिक्त पाणी

दिव्याला मिळणार अतिरिक्त पाणी

Subscribe

खासदार शिंदे यांची मागणी, उद्योगमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

ठाणे महापालिकेचा भाग असलेल्या आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात येणार्‍या दिवा शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे शहराची पाण्याची गरज वाढते आहे. हीच बाब ओळखून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिवा शहराला अतिरिक्त १० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ संबंधितांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे लवकरच दिवा शहराला अतिरिक्त पाणी मिळणार आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाणे महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत येणारे दिवा शहराचे झपाट्याने नागरीकरण होते आहे. ठाणे शहराचे उपनगर असलेल्या दिवा शहर परिसरातील मालमत्ता धारकांची लोकसंख्या सव्वा लाखांच्या घरात आहे. तर नवनवे गृहप्रकल्प, लहान मोठे उद्योग शहरात नव्याने उभारले जात आहेत. परिणामी शहराची लोकसंख्या वाढते आहे. दिवा शहराला पाण्याचा पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारित असलेल्या बारवी धरणातून करण्यात येतो. निळजे व कल्याण फाटा रिव्हरवूड येथून केलेल्या जोडणीतून हा पाणी पुरवठा केला जातो.

- Advertisement -

या पाण्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे. वाढती लोकसंख्येमुळे सद्यसिथतीत दिवा शहरामध्ये मोठया प्रमाणात पाणी टंचाई जाणवते आहे. तशा तक्रारी आल्याने कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना या परिस्थितीची माहिती दिली. दिवा शहराला ३१.५ दशलक्ष लीटर पाण्याचा साठा मंजुर करण्यात आला आहे. मात्र सध्या अवघा २७ ते २८ दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. त्यामुळे शहराची पाण्याची मागणी आणि भविष्याची गरज पाहता अतिरिक्त १० दशलक्ष लीटर पाणी देण्याची मागणी यावेळी डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. याबाबत यापूर्वीही अनेक वेळेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व प्रशासनासोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अजुनही दिवा शहरासाठी आवश्यक पाणी पुरवठा करण्यात येत नसल्याची बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

तातडीची गरज ओळखून उदयोग मंत्री सुभाष देसाई आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकार्‍यांना याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. एकूण मागणीपैकी येत्या आठवड्याभरात दिवा शहराला ५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश यावेळी सुभाष देसाई यांनी दिले. येत्या आठवडाभरात हे पाणी देण्याचे अधिकार्‍यांनी यावेळी मान्य केले आहे. तर पूर्ण १० दशलक्ष लीटरची मागणीही येत्या काळात पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दिवा शहराची पाणी टंचाई दूर होईल, अशी आशा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेटीनंतर व्यक्त केली. यावेळी नगरसेवक रमाकांत मढवी,आदेश भगत,शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव, नगरसेविका अंकिता पाटील, दिपाली भगत, सुनिता मुंडे, दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख उमेश भगत, भालचंद्र भगत, गुरुनाथ पाटील हे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

पाणी दाब वाढणार, योजना मार्गी लागणार
उद्योग मंत्री देसाई आणि नगरविकास तथा पालकमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत २७ गावातील पाण्याच्या दाबावरही चर्चा करण्यात आली. पाण्याचा दाब वाढल्यास पाणी पुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे त्याबाबत तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर बोलताना पाण्याचा दाब वाढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी अधिकार्‍यांना सुचवले. तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या अमृत योजनेतील पाणी पुरवठा योजनेच्या कामातील जागांचा अडसर दूर करण्याचीही विनंती यावेळी करण्यात आली. त्यावरही सकारात्मक प्रतिसाद मंत्री महोदयांनी दिल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -