ठाण्याचा पारा ४३.४ अंशावर

उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा व महापालिका प्रशासनाने केले

एकीकडे हवामान खात्याने उष्ण लहरींचा तडाखा बसणार असल्याची शक्यता वर्तवत काळजी घेण्याची आवाहन केले असताना, मंगळवारी ठाण्यात तापमानाचा पारा ४३.४ अंशावर गेला. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. तर सोमवारी ठाणे शहराचा पारा ४१ अशांवर होता. तसेच गतवर्षी याच दिवशी ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. हे तापमान यंदा ८ अंशाने वाढले यंदाचा उन्हाळ्यात सूर्यनारायण आग तर ओकणार नाही ना अशी भीती वर्तवली जाऊ लागली आहे.

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार सोमवारी ठाण्याचा पारा ४१ अंशावर गेल्याचे दिसून आले. तर उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा व महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यात मंगळवारी सकाळ पासूनच वातवरणात उष्णता जाणवत होते. तर, दुपारी हा पारा थेट ४३.४ अशांवर गेल्याचे दिसून आले. मागील वर्षी याच कालावधीत म्हणजेच याच दिवशी ठाण्याचे तापमान हे ३५ अशांवर होते. यंदा त्यात ८ अशांची भर पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठाणोकरांनी पुढील दोन दिवस काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

थंडपेयाकडे ठाणेकरांचा कल
मंगळवारी वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागल्याने अनेकांनी डोळ्यावर गॉगल, डोक्यात टोपी घातल्याचे पाहण्यास मिळून आले. त्यातच ठाणेकर नागरिकांनी घसा कोरडा होऊ लागल्याने आपला मोर्चा नारळ पाणी, सरबत, ताक या गाडीवर वळविला असल्याचे दिसून येत होते.