घरठाणेकल्याणातील ११ गावांसाठी स्मशानभूमीच नाही

कल्याणातील ११ गावांसाठी स्मशानभूमीच नाही

Subscribe

कल्याण पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येत असणार्‍या तालुक्यातील मोठी लोकसंख्या असणार्‍या किमान 11 गावात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यातील सहा विविध पक्षाचे आमदार तर दोन खासदार कार्यरत असताना अंत्यसंस्कारासाठी या गावातील मृतांवर उघड्यावर विधी केला जात आहे. कल्याण पंचायत समितीला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळत असतानाही या गावातील स्मशानभूमी उभारणीकडे सततचे दुर्लक्ष केले गेल्याने गावकर्‍यांमध्ये याबाबत तीव्र नाराजीचा सुर उमटू लागला आहे. पावसाळा मौसमात उघड्यावर मृतांवर अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत पार पाडावी लागत असते.

एकीकडे पावसाची सतत धार सुरू असताना उघडावर अग्नीडाग दिल्यावर सरणाच्यावर पाऊस पडू नये याकरिता चारी बाजूने अच्छादन धरावे लागत असते. कल्याण तालुक्यातील जुगाव, वावेघर, आंबिवली तर्फे चोप , धामटन, म्हसकळ, म्हारळ, अनखर, पितांबरे नगर, रायते, पिंपळोली,नवगाव या अकरा गावात स्मशानभूमी नसल्याने शेतात किंवा रानवनात या मृतांवर नातेवाईक अंत्यसंस्कार करीत आहेत. कल्याण पंचायत समिती तसेच ठाणे जिल्हा परिषदेवर कल्याण तालुक्यातील निवडून गेलेले लोकप्रतिनिधी देखील या महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देत असल्याने ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण तालुक्यातील विविध मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेलेल्या सहा आमदारांनी देखील स्मशानभूमी बाबत दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. वावेघर या ठिकाणी स्मशानभूमी संदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर नवगाव येथे स्मशानभूमी बांधण्याचे काम सुरू आहे. तर तालुक्यातील 73 गावात स्मशानभूमी असल्याचे यावेळी पंचायत समितीकडून सांगण्यात आले. स्मशानभूमी उभारण्याचा निधी दरवर्षी येत असतो मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने तो निधी परत पाठविला जातो अशी माहिती कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिली आहे. जागा उपलब्ध होत नसल्याने स्मशानभूमीचे काम रखडले असल्याचेही शेवटी भवारी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -