ठाण्यात ऑईलचा ट्रक उलटून २ जण जखमी

ट्रकमधील ऑईल रस्त्यावर पसरल्यामुळे ठाण्यातील मुंबई- नाशिक महामार्गावर सकाळीच वाहतूक कोंडी झाली होती.

Two injured as oil truck overturns in Thane
ठाण्यात ऑईलचा ट्रक उलटून २ जण जखमी

ठाण्यातून भरधाव वेगाने चाललेल्या एका ट्रकने मागून येत दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये धडक बसलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध जाऊन उलटला. त्यातच, ट्रकमधील ऑईलही रस्त्यावर पसरल्यामुळे ठाण्यातील मुंबई- नाशिक महामार्गावर सकाळीच वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी उड्डाणपुलावर घडली. या अपघातात दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तर अपघातग्रस्त दोन्ही ट्रक तातडीने हलवून वाहतूक सुरळीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ट्रकचालक जखमी किशोर (३०) हा रिकामा ट्रक घेऊन ठाण्यातून भिवंडीला निघाला होता. तो ट्रक घेऊन नितीन कंपनी उड्डाणपुलावरून जात असताना, ठाण्यातून वसईकडे जाण्यासाठी पाठीमागून भरधाव वेगाने चाललेला ट्रकचालक रफिक शेख (२५) याच्या ट्रकने किशोर याच्या ट्रकला धडक दिली.

ही धडक इतकी जोरात होती की किशोर याचा ट्रक पुढे जाऊन रस्त्याच्या मधोमध जाऊन उलटला. याचदरम्यान ट्रकमधील ऑईल आणि डिझेल रस्त्यावर सांडून पसरले. रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्याने आणि ऑईल पसरल्याने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांची तपासणी केली असता, दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाल्याने निदर्शनास आल्यावर त्यांना तातडीने रुग्णवाहिका बोलून ठामपा कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. तसेच, मधोमध उलटलेला ट्रक हा क्रेन बोलून त्याला रस्त्यातून बाजूला केले.

तसेच रस्त्यावर पसरलेल्या ऑईलमुळे वाहने घसरू नये म्हणून त्याच्या पाण्याचा मारा करण्यात आला. तो पर्यंत मुंबई कडे आणि मुंबई कडून ठाणे मार्गे नाशिक कडे जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून धिम्यागतीने सुरू होती. एकाच मार्गिकवर वाहतुक वळवल्याने ठाण्यात सकाळीच वाहतूक कोंडी झाली होती. याअपघातग्रस्त वाहने हलवल्याने वाहतूक साडेआठच्या सुमारास पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली. यावेळी, एक फायर इंजिन आणि एक क्यूआरटी वाहनाला पाचारण केले होते. तसेच भिवंडी येथील जखमी चालक किशोर याच्या डोक्याला तर नालासोपारा येथील रफिक याच्या पायाला दुखापत झाली आहे.