घरट्रेंडिंगबुद्ध पौर्णिमा: जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध

बुद्ध पौर्णिमा: जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध

Subscribe

तथागत भगवान गौतम बुद्धांची आज २५६४ वी जयंती आहे. जग हे अनित्य आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कार्यकारणभाव असतोच, त्यानुसारच मानवाने आपले वर्तन करावे, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला.

समता, शांती, बंधुभाव, प्रज्ञा, शील, करुणा आणि विवेकबुद्धीचा शाश्वत मार्ग मानवजातीला दाखवणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांची आज २५६४ वी जयंती आहे. गौतम बुद्ध यांनी जगाला विश्वशांतीचा संदेश दिला. जग हे अनित्य आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कार्यकारणभाव असतोच, त्यानुसारच मानवाने आपले वर्तन करावे, असा संदेश देणाऱ्या बुद्ध विचारांनी जगभरातील अनेकांना स्तिमित केलंय. वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. म्हणून वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हटलं जातं. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झालं. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरी केली जाते. चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील लोक मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी करतात. बौद्ध धम्मात बुद्ध पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रीलंकेमध्ये बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असं म्हटलं जातं.

“तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला. तेवत राहिला…” असं स्वामी विवेकानंद यांनी १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलताना म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा – भारतीय संस्कृतीने नेहमीच जगाला दिशा दाखवली – पंतप्रधान


गौतम बुद्धांनी त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळ्याच बदलाची पायाभरणी केली होती. त्याकाळी समाजात माजलेले अवडंबर, पशूबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांडाचा विरोध केला. अन्याय, विषमतेला बुद्धांनी विरोध केला. मानव कल्याणाचा उपदेश केला. बुद्धांनी लोकांमध्ये स्वर्ग आणि नर्क या भंपक गोष्टींबद्दल असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. ते महान गुरू होते. बुद्धांनी चार आर्यसत्य सांगितली. आर्यसत्य आचरणात आणल्यास मानव जीवन आनंदात घालवू शकतो.

- Advertisement -

चार आर्यसत्य

१. जगात दुःख आहे.
२. त्या दुःखाला कारण आहे.
३. हे कारण म्हणजे तृष्णा (वासना) होय.
४. वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय/मार्ग आहे.

बुद्धाने निर्वाण प्राप्तीसाठी अष्टांग मार्ग सांगितला आहे.

अष्टांग मार्ग

१) सम्यक दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

२) सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

३) सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.

४) सम्यक कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

५) सम्यक आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

६) सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

७) सम्यक स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

८) सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

बुद्धांनी पंचशील सांगितले आहेत. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी आणि शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच नियम सांगितले आहेत

पंचशील

१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून, लोभ व लालसेला बळी पडण्यापासून, भ्रष्ट आचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी’
अर्थ : मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी करण्यात आली. १९५१ मध्ये तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता. २७ मे १९५३ रोजी भारत सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -