एकनाथ शिंदे पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ट्विट

eknath shinde meets sharad pawar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या दुखण्यावर आज शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया पार पडली. पण मुख्यमंत्री उपचारासाठी दाखल झाल्यापासून एकुणच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्यानंतर काही तासातच एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुरूवारी सायंकाळी पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक याठिकाणी भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच याबाबतचे ट्विट करत फोटो शेअर केला आहे. शिंदे पवार भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या मुद्द्यावर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीने राज्यातील सत्ताकारणात काय घडामोडी घडणार याचाच तर्क वितर्क या भेटीच्या निमित्ताने सुरू झाला आहे. या फोटोनंतरच एकनाथ शिंदे यांच्याकडे तात्पुरत्या कालावधीसाठी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दिल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या.

एकनाथ शिंदेबाबत व्हायरल झालेली काय होती पोस्ट ?

एकनाथ शिंदे आणि पवारांच्या भेटीचा फोटो वापरून समाज माध्यमांवर मुख्यमंत्री पदाबाबतची एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. शिवसेना नेते व महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब पुढील एक महिना साठी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारणार, अशा आशयाची ही पोस्ट होती. पण या पोस्टमध्ये समाजमाध्यमांवर उडालेला गोंधळा पाहता खुद्द एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयालाच याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.

एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती.

तात्पुरता कार्यभार नाहीच – संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार तात्पुरत्या कालावधीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येणार अशा आशयाचा पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनाही मुख्यमंत्री पदाच्या तात्पुरत्या कार्यभारावर प्रसारमाध्यमांनी आज प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाचा तात्पुरता कार्यभार कोणाकडेही देण्यात येणार नाही. येत्या तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री स्वतः पुन्हा एक्टिव्ह होतील असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया यशस्वी 

एच. एन. रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या आणि कंबरेच्या दुखण्यावर आज शुक्रवारी छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. जवळपास १ तास शस्त्रक्रिया चालली. मुख्यमंत्री ठाकरेंना कंबरेच्या आणि मानेच्या स्नायूच्या दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळेच मुख्यमंत्री बुधवारीच रुग्णालयात दाखल झाले होते. मानेच्या दुखण्यात वाढ झाल्यानेच त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.


हेही वाचा – CM Health Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, १ तास चालली शस्त्रक्रिया