घरमहाराष्ट्रनिवडणुकीच्या मैदानात उतरला पहिला ठाकरे

निवडणुकीच्या मैदानात उतरला पहिला ठाकरे

Subscribe

आपलं महानगरने आदित्य गिरणगावातून विधानसभेतया मथळ्याखाली सर्वात प्रथम ६ जून २०१९ रोजीबातमी प्रसिद्ध केली होती.

गेल्या काही दिवसांपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची सुरू असलेली चर्चा सोमवारी अखेर समाप्त झाली. राज्याच्या १३ व्या विधानसभेत जाण्याची तयारी दर्शवताना वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची महत्वपूर्ण घोषणा स्वत: आदित्य यांनी कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणांच्या साक्षीने केली. वरळी विधानसभा मतदारसंघातील विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना आदित्य यांनी ही घोषणा केली. आईपुढे ही घोषणा करताना दडपण येत असल्याने तिला मागे बसायला सांगितले. आता मी पूर्णतः सैनिकांच्या आशीर्वादाने निवडणुकीला सामोरे जायला तयार आहे, अशी गर्जना करताच वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयाच्या सभागृहात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी विद्यमान आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंना पुषपगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

सांपासून बोलले जात होते. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ठाकरे घराण्यातील व्यक्तीने कोणतीच निवडणूक लढवली नव्हती. यामुळे आदित्य निवडणूक लढवतील की नाही, याविषयी राज्यभरात कुतूहल निर्माण झाले होते. आदित्य ठाकरे यांना निवडणुकीत उभे करून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा पण सेनेच्या नेत्यांनी केला होता. युतीची घोषणा होऊन मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा हेतू कायम ठेवत शिवसेनेच्या उपस्थित नेत्यांनी राज्याच्या सत्तेची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याच्या सूचना सैनिकांना केल्या. आपल्या उमेदवारीची घोषणा करताना वरळी हा आपला मतदारसंघ असला तरी महाराष्ट्र्र ही आपली कर्मभूमी आहे. वरळीबरोबरच मुंबई, ठाणे, रायगड, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे कल्याण करण्याचा हेतू आपल्या या उमेदवारीमागे असल्याचे आदित्य म्हणाले.

- Advertisement -

जन आशीर्वादाच्या निमित्ताने महाराष्ट्राने मला उचलून धरले. या यात्रेद्वारे मी नवी मने जिंकत होतो. महाराष्ट्रातल्या पिचलेल्या शेतकर्‍यांशी संवाद साधत होतो. गेल्या ५० वर्षांत आजोबा आणि वडिलांवर केलेले प्रेम काय आहे, याची झलक मी पाहिली. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याच्या आजोबांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे आदित्य म्हणाले. राज्याची सेवा ही सेनेच्या स्टाईलमध्ये करायची आहे. तुमची संमती असेल तर निवडणूक लढवून ही सेवा करण्याची माझी तयारी आहे, असे आदित्य यांनी सांगताच उपस्थितांनी जोरदार घोषणा देत आदित्य यांचे स्वागत केले. महाराष्ट्र म्हणजे आपला देश आहे. आई असते तेव्हा धडकी भरते. निवडणूक लढवणार हे जाहीर करताना तिला मी मागे राहायला सांगितले, असे सांगताना आता ओझे कमी झाले आहे, असे आदित्य म्हणाले.

सेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी आदित्य यांच्या घोषणेनंतर ठाकरे कुटुबियांकडे प्रथमच आली असल्याचे म्हटले. हा योग पाहायला शिवसेनाप्रमुख आज आपल्यात असायला हवे होते. आदित्य यांच्या उमेदवारीमुळे सेनेत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आता सेनेचा छावा राजकारणात आला असल्याने मुख्यमंत्रीपद घेतल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत बोलून गेले तेव्हा सभागृहात पुन्हा टाळ्यांचा गजर झाला. इतिहास घडवताना अनेकदा नियम बाजूला सारावे लागतात. आदित्य यांच्या रुपाने हे साध्य होत असल्याबद्दल राऊत यांनी समधान व्यक्त केले. या विजयी संकल्प मेळाव्याला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे, खासदार विनायक राऊत, मंत्री जयदत्त क्षीरसागर, रश्मी ठाकरे, आदित्य यांचे बंधू तेजसही उपस्थित होते.

- Advertisement -

आदित्य यांनी निवडणूक लढवण्याच्या केलेल्या घोषणेनंतर ठाकरे कुटुबियांकडे राज्याच्या नेतृत्वाची प्रथमच जबाबदारी आली आहे. आदित्य यांच्या उमेदवारीमुळे सेनेत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आता सेनेचा छावा राजकारणात आला असल्याने मुख्यमंत्रीपद घेतल्याशिवाय राहणार नाही. – संजय राऊत, प्रवक्ते, शिवसेना

शिवसेना-भाजप युती झाली पण जागावाटप नाही

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून भाजप-शिवसेनेची युती कधी जाहीर होणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती. या युतीची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्याचा प्रघात मोडीत काढत एका संयुक्त पत्रकाद्वारे युती झाल्याचे सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीच्या एका घोषणा पत्रकाद्वारे महायुतीचा मुहूर्त साधण्यात आला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेना-भाजपच्या युतीचे रडगाणे खूपच चर्चेत होते. शिवसेनेने ५० टक्के म्हणजे १४४ जागांचा फॉर्म्युला पुढे केल्यानंतर युतीबाबत भाजपतील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

विद्यमान आमदारांचे करायचे काय, असा प्रश्न भाजपपुढे निर्माण झाला होता. यातच सेनेने मुख्यमंत्री पदावर अनेकदा दावा सांगितल्याने तर युती होते की नाही, असा शंका निर्माण झाली होती. अखेर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात २०१४ च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाकडे कायम ठेवून उर्वरित जागा ५० टक्के या प्रमाणात वाटप करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार शिवसेनेकडे १२६, भाजपला १४४ आणि इतर पक्षांना १८ जागा देण्याच्या प्रस्तावाला संमती देण्यात आली. मात्र तरीही युतीतील दरी कमी होण्याची शक्यता दिसत नव्हती.

मुंबईसह गुहागर, ठाणे, पुणे येथील जागांच्या अदलाबदली करण्याच्या सेनेच्या मागणीमुळे युतीचे त्रांगडे सुटत नव्हते. अगदी सोमवारी आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली तेव्हाही मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यात आल्याने युतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यातच शिवसेनेने आपल्या विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देण्यास परस्पर सुरुवात केल्याने तर दोन्हीकडील कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची महत्वाची बैठक रविवारी नवी दिल्लीत बोलवण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि महाराष्ट्रातील काही केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडली. या बैठकीत इतर पक्षांसह १६२ जागा मिळत असल्याने युतीला हिरवा कंदिल देण्यात आला. भाजपकडून संमती आल्यावर सोमवारी संध्याकाळी सेना नेत्यांची विशेष बैठक ‘मातोश्री’वर बोलवण्यात आली. या बैठकीत युतीला मान्यता देण्यात आली. युतीच्या वतीने एक पत्रक प्रसिध्द करत युती झाल्याचे जाहीर करण्यात आली.

या घोषणापत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या यशस्वी कारभाराने महाराष्ट्राला वेगळ्या उंचीला नेऊन ठेवले असल्याचे म्हटले आहे. पुन्हा एकदा आगामी निवडणूक युतीने लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे तसेच सदाभाऊ खोत यांनी एकत्रित घेतल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. युतीची घोषणा झाली असली तरी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -