घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, विरोधात बसणार!

देवेंद्र फडणवीसांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, विरोधात बसणार!

Subscribe

अवघ्या ७९ तासांमध्ये अजित पवार आणि त्यांच्या आमदारांच्या गटाच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेलं देवेंद्र फडणवीस सरकार कोसळलं आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमत गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आजच सकाळी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हणजे उद्या संध्याकाळी ५ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते.

अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ‘अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलं नाही. आम्ही आधीपासूनच सांगितलं होतं की आम्ही कुणाचे आमदार फोडणार नाही. त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा आम्ही निर्णय घेतला की कुठलाही घोडेबाजार न करता आम्हीही राजीनामा देऊ. त्यामुळे मी राज्यपालांकडे राजीनामा सादर करणार. आत्ता सरकार स्थापन करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. पण मला भिती आहे की हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल. त्यांच्यात खूप मतभिन्नता आहे. शिवसेनेचे नेते सोनियाजींची शपथ घेत होते, तेव्हा आश्चर्य वाटलं की सत्तेसाठी त्यांना लाचारी स्विकारावी लागतेय. त्यांना ती लाचारी लखलाभ आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितलं आहे. दुपारी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

‘शिवसेनेनं स्वत:चं हसं करून घेतलं’

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत काय चर्चा झाली आणि युती कशी तुटली, याविषयी देखील मत व्यक्त केलं. ‘विधानसभेची मुदत संपल्यामुळे आम्हाला राज्यपालांनी पहिल्यांदा बोलवलं. शिवसेना सोबत नसल्यामुळे आम्ही संख्याबळ नाही हे सांगून नकार दिला. शिवसेनेला बोलावल्यानंतर संख्याबळ आहे असं भासवून त्यांनी स्वत:चं हसं करून घेतलं. राष्ट्रवादीनेही नकार दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देखील महाविकासआघाडीची सरकार तयार करणार अशी चर्चा सुरू होती. पण ते होऊ शकलं नाही. कारण विचारसरणीच्या दृष्टीने ते कुठेही एक नाहीत. त्यांचा कॉमन मिनीमम नाही, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे एवढाच कॉमन मॅक्झिमम प्रोग्रॅम त्यांचा होता’, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांसोबत कसं काय घडलं?

अजित पवारांनी अचानक भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये यायचा निर्णय कसा घेतला आणि त्यानंतर पुन्हा राजीनामा कसा दिला? याविषयी देखील देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ‘राष्ट्रपती राजवट किती काळ राहणार? या चिंतेमुळे अजित पवारांनी आम्हाला विचारणा केली. त्यांनी आम्हाला ते पाठिंब्याचं पत्र दिलं. त्या आधारावर आम्ही सरकार स्थापन केलं. आज कोर्टाचा निर्णय आला. उद्या बहुमत सिद्ध करायचं असताना अजित पवारांनी मला येऊन सांगितलं की काही कारणांमुळे मी या आघाडीमध्ये राहू शकत नाही. मी राजीनामा देत आहे’, असं फडणवीस यावेळी म्हणाले. ‘अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलं नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा राजीनामा देत आहोत. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू’, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.


हेही वाचा – ठरलं! उद्धव ठाकरेच पुढील पाच वर्षांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार!

दरम्यान, नव्या सरकारला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या. ‘भाजप अत्यंत प्रभावी विरोधी पक्षाचं काम करणार आहे. जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. २ चाकांचं सरकार वेगानं धावतं. पण हे तीन चाकांचं सरकार आहे. तीन चाकं तीन दिशांना धावायला लागलं, तर त्याचं काय होतं, तेच या सरकारचं होईल ही आम्हाला भिती वाटते’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -