घरमहाराष्ट्रउरणमध्ये शिवसेना-भाजपची रेटारेटी !

उरणमध्ये शिवसेना-भाजपची रेटारेटी !

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे उरण मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हा मतदारसंघ कधीकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी शेकापचे विवेक पाटील यांचा 811 मतांनी पराभव केला. हा पराभव मोठ्या मताधिक्याचा नसला तरी या मतदारसंघावरील शेकापची पकड नंतर ढिली पडत गेली हे मान्य करावे लागेल.

यावेळी पुन्हा शेकाप रिंगणात उतरणार हे स्पष्ट असले तरी उमेदवार कोण, यावर उलटसुलट चर्चा होती. कारण विवेक पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून अलिकडे काहीसे दूर होते. त्यामुळे ते निवडणुकीत उतरले नाहीच तर वहाळचे रवी पाटील यांचे नाव पुढे होते. मात्र रविवारी शेकापच्या बैठकीत विवेक पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा असला तरी भाजपकडून महेश बालदी यांनीही आपले नाव पुढे रेटले आहे. त्यामुळे युती झालीच तर पुन्हा मनोहर भोईर की महेश बालदी, असा तिढा निर्माण होऊ शकतो.

- Advertisement -

गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेना स्वतंत्र लढूनसुद्धा शेकापचे चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या विवेक पाटील यांना सेनेकडून पराभव पत्करावा लागला. भाजपाचे उमेदवार महेश बालदी यांनीदेखील लक्षणीय मते मिळवून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.

उरण व पनवेलसह खालापूर तालुक्याचा काही भाग मिळून हा विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी या मतदारसंघात 2 लाख 90 हजार 273 इतके मतदार होते. यामध्ये पुरुष मतदार संख्या 1 लाख 46 हजार 22, तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 44 हजार 248 होती. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप आघाडीचे पार्थ पवार यांना 86 हजार 699, तर शिवसेना-भाजपचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना 89 हजार 587 मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे मनोहर भोईर यांना 56 हजार 131, शेकापचे विवेक पाटील यांना 55 हजार 320, काँग्रेसचे महेंद्र घरत यांना 34 हजार 253 व भाजपाचे महेश बालदी यांना 32 हजार 632 मते मिळाली होती.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही दिवसातच बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. ही जागा भाजपाला सोडावी, असा श्रेष्ठींकडे आग्रह धरला आहे. मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून खर्‍या अर्थाने विकासाला चालना आपण दिली असल्याचा त्यांचा दावा आहे. विवेक पाटील गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र शेकाप हा तळागाळात रूजलेला पक्ष असल्याने ऐन निवडणुकीत शेकापचे कार्यकर्ते आपली ताकद दाखवून देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

काँग्रेस-शेकापची आघाडी झाल्यास हा मतदारसंघ शेकापला मिळण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेच्या निकालानंतर अनेक उमेदवारांची हवा निघाली आहे. विद्यमान आमदार भोईर यांनीदेखील शिवसेना-भाजप युतीकडून ही जागा लढविण्याची तयारी केली आहे. युती झाली नाही तरी त्यांना आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांमुळे विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. एकूणच उरण मतदारसंघात यावेळी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात अनेक समस्या प्रलंबित आहेत. विशेषतः उरणमधील कारखानदारीने होणारे प्रदूषण, धोकादायक कारखान्यांची वाढती संख्या, बेरोजगारीकडे राजकारण्यांचे झालेले दुर्लक्ष, आरोग्य सेवा, विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे वाढलेले प्रकार, रस्त्यांची दुर्दशा, वीज, पाणी असे एक ना अनेक प्रश्न आहेत. जनतेत त्याबद्दल उघड नाराजीही आहे. मात्र ही नाराजी मतपेटीत दिसणार का, हा खरा औत्सुक्याचा भाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -