बिहारमध्ये निवडणुकीत दंगल करण्याचा भाजपचा डाव होता -प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केला आहे. बिहारमधील एनडीएचा विजय आपल्याला मान्य नसल्याचेही ते म्हणाले आहेत. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता. पण भाजपाचा हा डाव आम्ही पूर्ण होऊ दिला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. बिहार विधानसभेत एनडीएला काटावर बहुमत मिळाले असून आपण हा त्यांचा विजय मानत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ईव्हीएमवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही टीका केली.

बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला १० हजारापर्यंत लोक उपस्थित असायचे. कोरोना संकटात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मग अशावेळी ती व्यक्ती चौथ्या क्रमांकावर कशी काय फेकली जाऊ शकते?, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केली. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढेच काम करत असल्याची टीका केली.