‘गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची CBI चौकशी का नाही’; गुलाबराव पाटील यांचा सवाल

सुशांतसिंह राजपूत यांनी काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारु, सिगारेट पिणारा नट होता, असा घणाघात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Gopinath-Munde-Gulabrao-Patil
गोपीनाथ मुंडे आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळाले आहे. दरम्यान, ‘सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी लावून धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाने भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही’, असा सवाल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

सुशांतने देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का?

‘असं पाहिला गेले तर राष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तीचा क्रार्यक्रम मिनिट टू मिनिट दाखवला जातो. मात्र, आता यामध्ये सुशांतसिंह राजपूत आणि कंगना यांच्या बातम्या मिनिट टू मिनिट दाखवल्या जात आहे. हे अयोग्य आहे. सुशांतसिंह राजपूत यांनी काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारु, सिगारेट पिणारा नट होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला आहे’, असे पाटील म्हणाले आहेत.

‘गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणाव असताना टीव्हीवर चीनची बातमी दिसत नाही. तर या कोरोनामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, असे असताना देखील कधी सीआयडी चौकशी भाजपाला का करावीशी वाटली नाही, असे ही पाटील पुढे म्हणाले आहेत. ‘बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून हे राजकारण सुरू आहे. टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे, म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू आहे,’ असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.


हेही वाचा – ‘तर आता जाईल २० कोटी लोकांची रोजीरोटी’, तरी मोदीजी गप्प का?