घरदेश-विदेशप. बंगालमध्ये राजकीय राडा होणार? १०७ आमदारांचा भाजपप्रवेश?

प. बंगालमध्ये राजकीय राडा होणार? १०७ आमदारांचा भाजपप्रवेश?

Subscribe

'पश्चिम बंगालमधले १०७ आमदार आमच्या संपर्कात आहेत', असा दावा भाजपनं करून खळबळ उडवून दिली आहे.

आधी कर्नाटक, नंतर गोवा आणि आता त्यापाठोपाठा पश्चिम बंगालचा नंबर लागतोय की काय, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस-जदसेच्या १४ आमदारांनी राजीनामा देऊन भाजप प्रवेशाची तयारी केल्यानंतर तिथलं सरकार पडण्याच्या काठावर येऊन थांबलं आहे. गोव्यात तर विरोधी पक्षात असून देखील काँग्रेसच्या १० आमदारांना फोडून भाजपनं त्यांचं पक्षांतर करून घेतलं. आता पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ घातल्याचं सांगितलं जात आहे. आणि हे भाजपच्याच राज्यातल्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस या तीन पक्षांमधले मिळून एकूण १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावाच या नेत्यानं केला आहे. त्यामुळे देशपातळीवर आणि राज्यपातळीवर देखील विरोधी पक्षांमध्ये खळबळ माजली आहे!

- Advertisement -

लोकसभेत भाजपचं घवघवीत यश!

पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपला १८ जागांवर घवघवीत यश मिळालं. या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून आता तृणमूल काँग्रेसच्या राज्यातल्या वर्चस्वाला कडवं आव्हान देण्याचा निर्धार भाजपनं केल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध पक्षातल्या आमदारांना पक्षांतर करून भाजपमध्ये घेण्याची खेळी पक्षाकडून खेळली जात आहे.


हेही वाचा – गोव्यातल्या बंडखोरीचं फलित; ४ आमदारांची मंत्रीपदाची शपथ!

भाजपकडे आमदारांची यादी तयार!

भाजपचे पश्चिम बंगालचे नेते मुकुल रॉय यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातला दावा केला आहे. ‘पश्चिम बंगालमधले एकूण १०७ आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यांची यादी आमच्याकडे तयार आहे. आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत’, असा दावा मुकुल रॉय यांनी केला आहे. ‘यामध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे’, असं देखील ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या उघड विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपनं तृणमूलला जाहीर आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -